रेल्वे स्थानकावर स्वच्छ भारत मिशनची ऐशीतैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:53+5:302021-06-16T04:08:53+5:30
नागपूर : रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. केवळ कोटेशनवर २० सफाई कर्मचारी संपूर्ण रेल्वे ...
नागपूर : रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. केवळ कोटेशनवर २० सफाई कर्मचारी संपूर्ण रेल्वे स्थानकाचा भार सांभाळत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सफाईच्या कंत्राटाचे नूतनीकरण करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट खासगी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले होते, परंतु हे कंत्राट ३१ मे, २०२१ रोजी संपल्यामुळे रेल्वे स्थानकावर तीन पाळीत काम करणाऱ्या ८० सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद झाले. रेल्वे स्थानकाची सफाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रेयांक ट्रेडर्स नावाच्या कंपनीला कोटेशनवर काम दिले. सध्या या कंपनीचे २० सफाई कर्मचारी रेल्वे स्थानकावर सफाईचे काम पाहत आहेत, परंतु रेल्वे स्थानकाचा व्याप पाहता, हे सफाई कर्मचारी पुरेसे नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. रेल्वे रुळावर प्रवाशांनी टाकलेले केळाची टरफले, भोजनाची पाकिटे, इतर कचरा साचून असल्यामुळे हा कचरा सडत असून, त्याची दुर्गंधी पसरत आहे. यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेल्वे प्रशासनाने नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा पाळला होता. त्यानुसार, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅटफार्म, रेल्वे रुळाची स्वच्छता, प्लॅटफार्मवरील शौचालय, रेल्वेचे विविध विभाग आणि पेंट्रीकारमधील स्वच्छता आदींची पाहणी केली होती, परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे सध्याच्या रेल्वे स्थानकावरील परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित सफाईचे कंत्राट देऊन रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
..............
८० सफाई कर्मचारी पडत होते कमी
रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट सुरू असताना ८० सफाई कर्मचारी तीन पाळीत काम करीत होते. हे सफाई कर्मचारीही स्वच्छतेच्या कामात कमी पडत होते, परंतु आता २० कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचा भार आल्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानकाची स्वच्छता सांभाळणे त्यांना कठीण होत आहे. त्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेल्वे रुळाशेजारील नाल्याही तुंबल्या
रेल्वेने जाणारे प्रवासी आपल्याजवळील केळ्याची साले, भोजनाची पाकिटे, पाण्याच्या बॉटल्स या रुळाच्या शेजारील नालीत टाकत आहेत. त्यामुळे रुळाच्या शेजारील नाल्या तुंबल्याची स्थिती आहे. रेल्वे रुळाशेजारील नाल्यातून घाण पाणी वाहते, परंतु या नाल्याच तुंबल्यामुळे घाण पाणी जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
.............