अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक : मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:05 PM2019-03-15T23:05:13+5:302019-03-15T23:06:25+5:30
मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
अजनी रेल्वेस्थानकापासून वंजारीनगरकडे जाण्याच्या मार्गावर ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी पूल बांधला होता. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिले होेते. या पत्रात पुलाची मुदत संपली असून या पुढे हा पूल वापरावयाचा असल्याच तुमच्या जबाबदारीवर वापरावा, असे नमूद करण्यात आले होते. ब्रिटिशांनी दिलेल्या पत्रावर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु अजनी रेल्वे पुलाची डागडुजी करून अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनचालक ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या ठिकाणी नव्याने पूल तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेश
रेल्वे राज्यमंत्री अधिर रंजन चौधरी यांनी डिसेंबर २०१३ मध्ये अजनी रेल्वेस्थानकाला भेट दिली होती. यावेळी विविध रेल्वे संघटनांनी अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना त्वरित हा पूल तोडण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची सूचना केली होती. परंतु तरीसुद्धा या पुलाबाबत अद्याप काही कारवाई होऊ शकली नाही.
अजनी पूल सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक
‘अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिशांनी रेल्वे प्रशासनाला कळविले होते. त्यावर प्रशासनाने कारवाई करून नवा पूल तयार करण्याची गरज होती. परंतु रेल्वे प्रशासनाने त्यावर काहीच उपाययोजना केली नाही. हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असून दुर्घटना घडण्यापूर्वी हा पूल तोडण्याची गरज आहे.’
बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र