चौकशीसाठी अजित पारसे वैद्यकीयदृष्ट्या ‘फिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 08:21 PM2022-11-24T20:21:43+5:302022-11-24T20:23:21+5:30

Nagpur News पीएमओ आणि दिग्गज नेत्यांशी ओळख असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या अजित पारसेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो चौकशीसाठी वैद्यकीयदृष्ट्या ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला असून तसे पोलिसांनादेखील कळविले आहे.

Ajit Parse medically 'fit' for interrogation | चौकशीसाठी अजित पारसे वैद्यकीयदृष्ट्या ‘फिट’

चौकशीसाठी अजित पारसे वैद्यकीयदृष्ट्या ‘फिट’

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून लवकरच होणार चौकशी प्रकृतीमुळे अद्यापही अटकेसाठी प्रतीक्षाच

नागपूर : पीएमओ आणि दिग्गज नेत्यांशी ओळख असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या अजित पारसे याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन ४२ दिवस झाले आहेत. वैद्यकीय कारणे देत त्याने चौकशीचा ससेमिरा टाळला होता. मात्र, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो चौकशीसाठी वैद्यकीयदृष्ट्या ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला असून तसे पोलिसांनादेखील कळविले आहे. त्यामुळे लवकरच त्याची चौकशी होणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

११ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेने डॉ. राजेश मुरकुटे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पारसे याने डॉ. मुरकुटे यांची ४५ लाखांची फसवणूक केली होती. यानंतर ९ नोव्हेंबर रोजी वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांनी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. पारसे याने अनेक महिलांना ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी पारसेचा मोबाइल तपासला. यामध्ये पारसे याने सहा महिलांसोबत केलेले अश्लील चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले. त्या महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण केल्याचा संशय आहे. बदनामीच्या भीतीमुळे या महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. फसवणूक झालेल्या महिलांशी काही महिलांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीचे बळी ठरलेले लोक ‘हनीट्रॅप’मध्ये फसल्याने ते तक्रार नोंदवत नाहीत. प्रकृतीचे कारण दिल्याने पारसेला अटक झालेली नाही. तो खूप आजारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत तो एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीमुळे त्याची चौकशीदेखील पोलिसांना करता आली नव्हती; परंतु पोलिस आता त्याची भेट घेऊन चौकशी करू शकतात, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्तांनादेखील कळविले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता आहे.

तूर्तास अटक मात्र नाही

अजित पारसे चौकशीसाठी जरी ‘फिट’ असला तरी पोलिसांना त्याला अटक मात्र करता येणार नाही. वैद्यकीय कारणांमुळे आम्हाला त्याची चौकशी करता येत नव्हती. आता ते दरवाजे मोकळे झाले असले तरी तो दवाखान्यातच आहे. त्याची प्रकृती लक्षात घेता त्याला अटक करता येणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Ajit Parse medically 'fit' for interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.