अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 04:03 PM2022-10-18T16:03:28+5:302022-10-18T16:05:19+5:30

साडेतीनशे ग्रॅम सोनेही जप्त

Ajit Parse's arrest delayed, sent to de-addiction center | अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा

अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा

googlenewsNext

नागपूर : एका होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तथाकथित सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसेची सोमवारी व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी करण्यात आली. प्रकृती खराब असल्याने त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते, परंतु त्याने घरी आरडाओरड, सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी केली. या संदर्भात पोलीस व गुन्हेशाखेलाही कळविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनाक्रमामुळे आता त्याच्या अटकेसाठी पोलिसांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.राजेश मुरकुटे यांची महाविद्यालय उघडणे व सीएसआर फंडाच्या नावाखाली त्याने साडेचार कोटींनी फसवणूक केली. या संदर्भात गुन्हा दाखल होताच, अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे दावे सुरू झाले, परंतु तक्रारीसाठी कुणीही समोर न आल्याने पोलिसांना आणखी गुन्हे दाखल करता आले नाही.

अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

दरम्यान, गुन्हा दाखल झाला, त्यावेळी पारसे प्रकृती अस्वास्थ्यामुळे इस्पितळात दाखल होता. त्यानंतर, घरी आल्यावर त्याने मनगट व गळ्यावर चाकूने वार करत, आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अटक केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितने सोमवारी घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. यासोबतच स्वत:च्या घरातील भिंतीवर अनेक वेळा डोके आपटण्यास सुरुवात केली. जवळच्या अनेक व्यक्तींनी त्याच्याकडे पाठ फिरविल्याने तो प्रचंड संतप्त झाला आहे. त्याच्या रागाची तीव्रता पाहून कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविले. अगोदर इस्पितळ व आता व्यसनमुक्ती केंद्रात गेल्याने, आता त्याची अटक लांबली असल्याचे दिसून येत आहे.

१७ लाखांचे सोने जप्त

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानंतर अजितने अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून, स्थावर मालमत्तेत मोठी रक्कम गुंतवली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराचीही झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांनी अजितच्या सुमारे ६ बँक खात्यांचे पासबुक आणि एटीएम कार्डही जप्त केले आहेत. त्यांचे बँक लॉकर सील करण्याबरोबरच त्यांची वाहनेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्याच्याकडून साडेतीनशे ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची बाजारभावानुसार १७ लाखांंच्या जवळपास किंमत आहे.

Web Title: Ajit Parse's arrest delayed, sent to de-addiction center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.