अजित पवार गटाला विदर्भात २० जागा मिळाव्या, धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी
By कमलेश वानखेडे | Published: June 21, 2024 03:28 PM2024-06-21T15:28:12+5:302024-06-21T15:28:39+5:30
सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्रिपद सोडले
नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत कुणामुळे जागा कमी मिळाल्या यावर चर्चा कारण्यापेक्षा जास्त जागा निवडून कशा येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विधानसभेसाठी लवकर जागा वाटप होऊन कामाला लागलो तर २०० जागा निवडून येतील. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) विदर्भात २० जागा मिळाव्या ही मागणी आहे. यापैकी गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये मिळून ५ जागा मिळाव्या, अशी मागणी अन्न व औषध प्रशसान राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्रा यांनी केली.
शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आत्राम म्हणाले, मी सहा महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते की मला गोंदियाचे पालकमंत्रिपद झेपणार नाही. मी पालकमंत्रिपद सहा महिने आधीच सोडले. त्यावर शिक्कामोर्तब करायला सांगितले आहे. गडचिरोलीमध्ये विधानसभेच्या जास्त जागा जिंकायचे असेल तर मला पालकमंत्रिपदातून मुक्त करा, अशी विनंती मी केली. अजित पवार यांनी ती मान्य केली आहे. यात नाराजीची बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आम्ही एक वर्षापासून ऐकत आहोत. जेव्हा होईल तेव्हा पाहू. विधान परिषदेवर एक आदिवासी प्रतिनिधी गडचिरोली मधून पाठवला तर त्याचा फायदा होईल, असेही आत्राम म्हणाले. छगन भुजबळ आमचे नेते आहेत. मीदेखील गडचिरोलीची जागा मगितली होती. निवडून देखील आलो असतो. पण आता तो विषय उरला नाही, असे सांगत त्यांनी भूजबळ यांच्या नाराजीवर पडदा टाकला.