अजित पवार कधीच सत्तेत येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 05:16 PM2022-10-03T17:16:33+5:302022-10-03T17:27:17+5:30
Nagpur News अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाहीसारखं एकतर्फी सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असे प्रत्क्त्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
कमलेश वानखेडे
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सत्ता गेल्यावर पुन्हा सत्तेची स्वप्न पडायला लागली आहेत. अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाहीसारखं एकतर्फी सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी टोमणे सभा बंद करून महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा, अन्यथा त्यांच्या सोबत असणारे लोकही साथ सोडून जातील. त्यांचा पक्ष हम दो, हमारे दो या अवस्थेत उरेल असा सल्ला त्यांनी दिला.
नवे सरकार आल्यावर राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. हिंदू व इतर धर्मियांच्या सणावर असलेली बंदी उठली आहे. यामुळे राज्यात सर्वत्र हर्षउल्हासाचे वातावरण आहे, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
भुजबळ हे राष्ट्रवादीतील ओवेसी
- सरस्वतीवर छगन भुजबळ यांनी केलेली टीका दुर्दैवी आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणारे ते राष्ट्रवादीमधील औवेसी आहेत. अशी टीका बावनकुळे यांनी केली.
नाना पटोलेंना गांभीर्याने घेऊ नका !
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल नाना पटोले यांना माहिती नाही असे सांगून बावनकुळे म्हणाले, २०१४ ते २०१९ या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्राने त्यांची क्षमता बघितली आहे. फडणवीस यांचे काही प्रायव्हेट व्यवसाय नाहीत. त्यामुळे ते सहा नाही तर आठ जिल्हे सांभाळू शकतात. पटोले गोंधळलेले आहेत, त्यांचा बॅलन्स सुटला आहे, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे ते अशी विधाने करून गांधी कुटुंबीयांजवळ आहोत हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.