अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद; राऊतांनी चिथावणीखोर बोलणे टाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 07:19 PM2023-03-31T19:19:40+5:302023-03-31T19:20:26+5:30
Nagpur News विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संयमाची घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. मात्र शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यांनी असा प्रकार टाळावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शांतता असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संयमाची घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. मात्र शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यांनी असा प्रकार टाळावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जे झाले ते दुर्दैवी आहे. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे. संजय राऊत चिथावणीखोर वक्तव्ये करत असून आता परत शांततेला तडा गेला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अजित पवार यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनीदेखील संयमित भूमिका घ्यावी, असे बावनकुळे म्हणाले. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून लवकरच या घटनेतील सूत्रधार समोर येतील असेही बावनकुळे म्हणाले.