अजनीत दारुचा साठा पकडला

By admin | Published: February 19, 2017 02:16 AM2017-02-19T02:16:24+5:302017-02-19T02:16:24+5:30

अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोली वस्तीत शुक्रवार आणि शनिवारी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र राबवून पाच ठिकाणांहून

Ajne caught the liquor stock | अजनीत दारुचा साठा पकडला

अजनीत दारुचा साठा पकडला

Next

पोलिसांची धडक कारवाई : पाच जणांना अटक
नागपूर : अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोली वस्तीत शुक्रवार आणि शनिवारी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र राबवून पाच ठिकाणांहून ५ हजार लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे अनेकांकडून विविध झोपडपट्ट्यांमध्ये गावठी दारू पोहचविली जात आहे. त्यामुळे ही दारू गाळणारे आणि विकणाऱ्यांनी मोठा साठा जमविणे सुरू केले आहे. अशाच प्रकारे रहाटे टोलीतील दारू विक्रेत्यांनी दारूचा मोठा साठा जमविल्याची माहिती अजनी पोलिसांना कळाली. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी पूनम संजय मानकर (वय ३०, रा. शंकर मंदिराजवळ, रहाटे टोली) हिच्या घरी धाड घातली.
तिने आणि तिच्या साथीदारांनी जमिनीत खड्डे करून ड्रम आणि माठात मोहाफुलांचा सडवा, कच्चा माल, आणि ९५० लिटर गावठी दारू लपवून ठेवली होती. ही दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी यावेळी पूनम मानकर हिला अटक केली.
त्याचप्रमाणे शनिवारी याच भागातील सुमन देशीलाल मानकर (वय ५५), मंजुळाबाई चठ्ठासिंग लोंडे (वय ४५), अंकुश मोहन देशपांडे (वय ४५) आणि विनोद लक्ष्मणराव भोयर (वय ३६) या ठिकाणी धाडी घातल्या. येथेही पोलिसांना जमिनीत ड्रम आणि माठ गाडून त्यात गावठी दारू गाळण्यासाठी बनविलेला सडवासह ३९५० लिटर दारूसाठा आढळला. पोलिसांनी हा ३ लाख, ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)

रेल्वेस्थानकावरही कारवाई
रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर ८४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३५० बॉटल्स जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान अर्जुन सिंह यास रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याने याची सूचना आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. त्यांनी आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णानंद राय, होतीलाल मीना, दिलीप कुमार, अर्जुन सिंह, आर. एल. गुर्जर, विकास शर्मा, बिक्रम यादव, उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक डी. पी. वरठी, एस. एस. मानकर, ए. आर. बोथले यांची चमू गठित केली. या चमूने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर संयुक्तरीत्या धाड टाकली. यावेळी इटारसी एण्डकडील भागात एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. या बॅगची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ८४०० रुपये किमतीच्या ३५० बॉटल आढळल्या.

Web Title: Ajne caught the liquor stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.