अजनी हा मोठा विषय, गडकरींशी चर्चा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:58+5:302021-06-06T04:07:58+5:30
नागपूर : अजनी वनाच्या संरक्षणासाठी सुरू असलेला स्थानिक नागरिकांचा लढा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहचला आहे. ...
नागपूर : अजनी वनाच्या संरक्षणासाठी सुरू असलेला स्थानिक नागरिकांचा लढा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहचला आहे. हे वन वाचविण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहीणार असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये त्यांनी अजनी वनाचा उल्लेख केला. या वनाच्या जतनासाठी आम्ही भूमिका घेणार असल्याचे सांगत वन वाचावे यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र लिहीणार असल्याने त्यांनी वेबिनारमधून सांगितले. त्यांना यापूर्वी पत्र लिहून रस्त्यात येणारे ४०० वर्षाचे झाड वाचवू शकलो, तसेच केंद्राला पत्र लिहून ताडोबा प्रकल्पाच्या जवळ येऊ पाहणारे मायनिंग प्रकल्प थांबविल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. अजनी वन परिसरात ८ ते १० हजार झाडे आहेत. त्यातील ५ हजार झाडे कापून तिथे इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. मात्र नागपुरातील पर्यावरणवाद्यांनी या वृक्षतोडीसाठी प्रारंभापासून विरोध चालविला आहे. युवा सेना कार्यकर्त्यांनी या विरोधात निवेदने दिली असून वारंवार हे प्रकरण पर्यावरण मंत्र्यांपर्यंत पोहचविले आहे. ‘लोकमत’नेही प्रारंभापासूनच हे प्रकरण सातत्याने उचलून धरले आहे. अजनी वनाबद्दल पर्यावरण मंत्र्यांनी भूमिका घेण्याची तयारी दाखिवणे हे त्याचेच हे यश मानले जात आहे.