अजनी माॅडेल स्टेशन भांडवलदारांच्या फायद्यासाठीच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:28+5:302021-01-20T04:10:28+5:30
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी हजाराे झाडांच्या कत्तलीसाठी कारणीभूत ठरणारा अजनी इंटर ...
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी हजाराे झाडांच्या कत्तलीसाठी कारणीभूत ठरणारा अजनी इंटर माॅडेल स्टेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. शहरातील मधाेमध असलेली काेट्यवधीची जमीन भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी आयएमएस प्रकल्प राबविला जात असल्याची टीका वर्तक यांनी केली.
काँग्रेस विचार जनजागृती अभियानच्या कार्यकर्त्यांनी अजनी आयएमएस प्रकल्पासाठी हाेणाऱ्या वृक्षताेडीविराेधात आंदाेलन केले. यावेळी वर्तक यांनी केंद्र सरकार, रेल्वे आणि महापालिकेच्या भूमिकेवर सडकून टीका केली. झाडांमुळे माणसांचा श्वास चालताे आणि येथे विकासाच्या नावावर एवढ्या माेठ्या प्रमाणात वृक्षताेड केली जात आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सायकलने मनपा कार्यालयात येणारे मनपा आयुक्त अजनीच्या वृक्षताेडीबाबत गप्प का, असा सवाल वर्तक यांनी उपस्थित केला. यावेळी माजी नगरसेवक तनवीर अहमद, ॲड. अशाेक यावले, ॲड. शिरीष तिवारी, मनाेज काळे, नरेश खडसे, बाबा कुरहाडे, सुनील अग्रवाल, प्रकाश शेगावकर, भीमराव लांजेवार, साेहन पटेल, शरद बाहेकर, आनंदसिंग ठाकूर, गाैतम कांबळे, शेख इस्माईल, राजू जिवने, ताराचंद हाडके, शेख अजहर, रामभाऊ कवाडकर, श्यामसुंदर आष्टीकर, शेख रसीद, जगदीश यादव, सुनील वाकाेडे, अशाेक अरखेल, सैयद बिस्मिल्ला, अशाेक लाेंढे, दामाेधर धर्माळे, नसीम अनवर, किसन निखारे आदी उपस्थित हाेते.
रेल्वे मेन्स शाळेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पामुळे हजाराे झाडे ताेडली जात आहेत तर दुसरीकडे हजाराे मुलांना घडविणारी रेल्वे मेन्स शाळाही ताेडण्यात येणार आहे. यामुळे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. ही शाळा ताेडण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा म्हणून रेल्वे मेन्स शाळा माजी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने महापाैर तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. अनिकेत कुत्तरमारे, पीयूष दियफाेडे, हर्षल पन्नासे यांच्या नेतृत्वात सादर केलेले निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री आदींना पाठविण्यात आले असल्याचे अनिकेतने सांगितले.
२६ ला सायकल रॅली
प्रस्तावित अजनी इंटर माॅडेल स्टेशनसाठी हाेणाऱ्या वृक्षताेडीविराेधात पर्यावरण प्रेमींकडून येत्या २६ जानेवारी राेजी प्रजासत्ताक दिनी भव्य सायकल रॅली काढली जाणार आहे. अजनी काॅलनी परिसरासह शहरात ही सायकल रॅली भ्रमण करणार असून यामध्ये हजारावर सायकलस्वार सहभागी हाेणार असल्याचे कुणाल माैर्य यांनी सांगितले. झाडांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी हाेण्याचे आवाहन त्यांनी केले.