अजनी-पुणे रेल्वेगाडीच्या प्रवाशांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:44 AM2017-10-24T00:44:43+5:302017-10-24T00:49:47+5:30
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती. त्यानुसार ही गाडी सोमवारी दुपारी ४.१५ वाजता अजनी स्थानकावरून सुटणार होती. परंतु ही गाडी रात्री १२.१५ वाजेपर्यंत सुटली नसल्यामुळे या गाडीने प्रवास करणाºया प्रवाशांनी अजनी रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.
रेल्वे प्रशासनाने २३ आॅक्टोबरला अजनी-पुणे या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली होती. पुण्याला जाणाºया प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. सोमवारी या गाडीने प्रवास करणारे प्रवासी गाडीच्या नियोजित वेळी अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचले. परंतु गाडी प्लॅटफार्मवर लागली नाही. प्रवाशांनी चौकशी केली असता, त्यांना पुण्यावरून गाडी आली नसल्याचे सांगण्यात आले. अखेर रात्री ८.३० वाजता ही गाडी पुण्यावरून आली. मात्र, देखभालीसाठी ही गाडी अजनी यार्डात पाठविण्यात आली. रात्री १२.१५ पर्यंत ही गाडी प्लॅटफार्मवर लागली नसल्यामुळे प्रवाशांनी अजनी स्थानकावर गोंधळ घातला होता. प्रवाशांच्या गोंधळामुळे लोहमार्ग पोलीस आणि अजनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा ताफा अजनी स्थानकावर तैनात करण्यात आला होता.
सलग दुसºया दिवशी तीच चूक
रविवारी रेल्वेगाडी क्रमांक ०१०७६ नागपूर-मुंबई ही विशेष रेल्वेगाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटणार होती. परंतु ही गाडी दोन तास होऊनही प्लॅटफार्मवर न लागल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला होता. अखेर रात्री ९.३० वाजता ही गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. सलग दोन दिवस रेल्वे प्रशासनाने ही घोडचूक केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.