अजनी सॅटेलाईट टर्मिनलचे काम सुरू : आठ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:17 PM2019-06-03T23:17:25+5:302019-06-03T23:19:00+5:30
अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल बनविण्याच्या कामाने पुन्हा एकदा गती घेतली आहे. बजेटमध्ये घोषणा केलेला आठ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे हे काम मागील सहा महिन्यांपासून थांबले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल बनविण्याच्या कामाने पुन्हा एकदा गती घेतली आहे. बजेटमध्ये घोषणा केलेला आठ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे हे काम मागील सहा महिन्यांपासून थांबले होते.
अजनी रेल्वेस्थानकावर सुरू झालेल्या कामात स्टॅबलिंग लाईन, सिस्टीम ऑफीस, प्लॅटफार्म ३ ची ड्रेन व वॉटरिंग सिस्टीमचे काम करण्यात येत आहे. यानंतर येथे प्लॅटफार्म क्रमांक ५, ६, ७ आणि ८ तयार होणार आहे. कॉलनीकडे एक टर्मिनल व गेट तयार करण्यात येईल. शहरात रेल्वेच्या विकासासाठी निगडित ही मोठी योजना आहे. यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण कमी होणार आहे. प्रवाशांना अधिक सुविधा आणि अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविता येऊ शकणार आहे. हे काम मे २०१८ पासून सुरू झाले होते. सुरुवातीला कॅरेज अॅन्ड वॅगन शाखेसाठी इमारत तयार करण्यात आली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार वर्षभरात ५० लाख, १.५० कोटी आणि पुन्हा ५० लाख रुपये तीन टप्प्यात मिळाले. १९ कोटीच्या योजनेसाठी ही अतिशय कमी रक्कम आहे. सॅटेलाईट टर्मिनसचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु पहिल्या वर्षी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ काम थांबल्यामुळे ते वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. आता आठ कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. हे काम मध्य रेल्वे झोन मुख्यालयाच्या बांधकाम शाखेच्या देखरेखीखाली सुरू आहे.
एनएचएआय करणार काम
अजनी रेल्वे परिसरात रेल्वेशिवाय नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) याला इंटर मॉडेल स्टेशन करणार आहे. एक हजार कोटीच्या या प्रकल्पात होणाऱ्या या कामानंतर अजनी रेल्वेस्थानक देशातील पहिले सर्व सोयीसुविधायुक्त स्टेशन ठरणार आहे. इंटर मॉडेल स्टेशनमध्ये बसस्टॅन्ड, मेट्रो रेल्वे, ई-रिक्षा, टॅक्सी उपलब्ध राहील. ७५ एकर जमिनीवर तीन लेव्हलवर सुविधा राहतील. यात अंडरग्राऊंड पॅसेंजर लाऊंज, व्हीकल पार्किंगसारख्या व्यवस्थांचा समावेश आहे.
चार महिन्यानंतर सुरू होणार काम
‘रेल्वेसोबत अजनी इंटर मॉडेल स्टेशन तयार करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. जमिनिशी निगडित काही औपचारिकता शिल्लक आहेत. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यानंतर कामाला सुरुवात होईल.’
एम. चंद्रशेखर, प्रादेशिक महाव्यवस्थापक, एनएचएआय