सम्यकच्या अकाली एक्झिटने नागपूरच्या नाट्यसृष्टीत हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:43 PM2018-01-23T22:43:03+5:302018-01-23T22:47:32+5:30
१५ व्या बालनाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाचे कसब दाखविणाऱ्या बालनाट्य कलावंताची अकाली एक्झिट नाट्यसृष्टीत खळबळ माजवून गेली. सम्यक गजभिये असे बालकलावंताचे नाव असून, त्याने स्पर्धेत ‘बालभगत’ या नाटकात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आकर्षित केले होते. परंतु स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक घेण्यासाठी सम्यक या जगातून निघून गेला होता. या गुणी कलावंताचे असे निघून जाणे त्यांच्या कुटुंबालाच नाही तर स्पर्धेसंबंधित साऱ्यांना रडवून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ व्या बालनाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाचे कसब दाखविणाऱ्या बालनाट्य कलावंताची अकाली एक्झिट नाट्यसृष्टीत खळबळ माजवून गेली. सम्यक गजभिये असे बालकलावंताचे नाव असून, त्याने स्पर्धेत ‘बालभगत’ या नाटकात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आकर्षित केले होते. परंतु स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक घेण्यासाठी सम्यक या जगातून निघून गेला होता. या गुणी कलावंताचे असे निघून जाणे त्यांच्या कुटुंबालाच नाही तर स्पर्धेसंबंधित साऱ्यांना रडवून गेले.
बालनाट्य स्पर्धेत आठ दिवसांपूर्वी त्याने केलेल्या अभिनयाने सर्व प्रेक्षक भारावून गेले होते. हा मुलगा भविष्यात मोठे नाव कमावणार असे सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे साऱ्याचे लक्ष स्पर्धेच्या निकालाकडे होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. या स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळवणारा सम्यक गजभिये सोमवारी सकाळी निकाल लागला तेव्हा हे जग सोडून गेला होता. अंगात भिनलेला ताप डोक्यात जाण्याचे साधे निमित्त त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित १५ व्या बालनाट्य स्पर्धेत आठ दिवसांआधी ‘बालभगत’ या नाट्यातून आपल्या अभिनयाचे कसब दाखवत रसिकांची दाद मिळविली होती. हा १२ वर्षीय कलावंत शताब्दी चौकातील रमाईनगरात राहत होता. तो बिपीन कृष्णा शाळेचा सातवीचा विद्यार्थी होता. दोन दिवसापूर्वी त्याला ताप आला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप डोक्यात शिरल्याने त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. त्याच्यावर मानेवाडा स्मशानभूमीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सम्यकने रमाई, डोंबारी, भट्टी या बालनाटकात भूमिका केल्या होत्या. राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या ‘विठाबाई’ मध्येही त्याची छोटी भूमिका होती. पाच वर्षांपूर्वी तो नाट्य कलावंत संजय जीवने आणि सांची जीवने यांच्या संपर्कात आला. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या नाटकात काम करू लागला. बालनाट्य स्पर्धेत बौद्ध रंगभूमीच्यावतीने ‘बालभगत’ नाट्य प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यात सम्यकने भगतसिंगच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाला रसिकांची दाद मिळाली होती.