अखिल कुणबी समाजाने जाळली मनुस्मृती
By admin | Published: April 1, 2016 03:27 AM2016-04-01T03:27:03+5:302016-04-01T03:27:03+5:30
महाल चिटणवीसपुरा येथील कुणबी समाजभवनापुढे अखिल कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सार्थ श्री मनुस्मृती पुस्तकाच्या फोटो कॉपी जाळून आपला संताप व्यक्त केला.
नागपूर : महाल चिटणवीसपुरा येथील कुणबी समाजभवनापुढे अखिल कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सार्थ श्री मनुस्मृती पुस्तकाच्या फोटो कॉपी जाळून आपला संताप व्यक्त केला.
अखिल कुणबी समाजाचे सचिव अशोक वानखेडे यांच्या अध्यक्षस्थानी आणि माजी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या पुस्तकात तेली, कुणबी, कलार, कलाल, सोनार, माळी, चांभार आदी समाजाबाबत आणि महिलांबाबत हीन लिखाण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने २० वर्षांपूर्वी या पुस्तकावर बंदी आणली असतानाही या पुस्तकाचे भाषांतर करून नव्याने प्रकाशन करण्यात आले.
संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या समकालीन संतांनी व समाजसुधारकांनी मनुवादाला विरोध केला होता, मनुस्मृतीतील जाती व्यवस्थेला नाकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मनुवादाला कट्टर विरोध करून आधुनिक समाज निर्माण करून सर्वधर्मसमभावाची संकल्पना मांडली होती. या सर्वांच्या विचारांना अप्रत्यक्षरीत्या विरोध करण्याचे कार्य या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे होत आहे. विविध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मत या वेळी व्यक्त करून मनुस्मृतीचा निषेध करण्यात आला.
कुणबी सेवा संघ, कुणबी युवा मंच आणि अखिल कुणबी समाजाद्वारे या पुस्तकाच्या फोटो कॉपी जाळण्यात आल्या. या पुस्तकावर त्वरित बंदी आणल्या गेली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष पंकज पांडे यांनी दिला.
या आंदोलनात राजू भेंडे, राज तिजारे, चेतन वडे, संदीप भोयर, राजेश काकडे, बाळाभाऊ शिंगणे, नितीन मालोदे, भास्कर टाले, अॅड. कीर्तीकुमार कडू, कपील कुहिटे, राजू खडसे, राज वानखेडे, पिंटू नखाते, पंकज पांगुळे, लाभेश ढोक यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)