अखिलेश पेशवे कृष्णकुमार सुवर्णपदकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:16+5:302021-09-04T04:11:16+5:30
नागपूर : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ...
नागपूर : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित म.पा. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ.आर. कृष्णकुमार सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येईल.
नागपूर विद्यापीठात दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा यात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षक (सामाजिक कार्यकर्ता), उत्कृष्ट संशोधक व उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचा समावेश आहे. एलआयटीतील सहायक प्राध्यापक डॉ.एन. तेजो कल्याणी व प्रियदर्शिनी भगवती कॉलेज ऑफ इंजनिअरिंग येथील अर्चना चौधरी यांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदा दोन्ही उत्कृष्ट शिक्षक महिलाच आहेत हे विशेष.
कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉ. ब्रिजेश ताकसांडे व नागपूर विद्यापीठाच्या भूविज्ञानशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वंदना सामंत यांना उत्कृष्ट संशोधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर प्रियदर्शिनी जे.एल. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. दिनेश चापले यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल. उत्कृष्ट लेखक म्हणून रामटेक येथील विद्यासागर कला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सावन धर्मपुरीवार यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात एकही उत्कृष्ट शिक्षक नाही
कोरोनाच्या कालावधीत विविध महाविद्यालये, विद्यापीठाचा रासेयो विभागातर्फे समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु विद्यापीठाने उत्कृष्ट शिक्षक (सामाजिक कार्य) या पुरस्कारासाठी एकही निवड केली नाही. शिक्षकांचे अर्जच आले नाही की यामागे आणखी कुठले कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऑनलाईन होणार समारंभ
५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांची उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी राहतील तर प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे प्रामुख्याने उपस्थित राहतील.