परमबीर प्रकरणात अकोला पोलिसांचा रोल संपला; आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:42 AM2021-04-30T05:42:54+5:302021-04-30T05:45:10+5:30
दिवसभर राज्य पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदीर्घ विचारमंथन झाले.
नरेश डोंगरे
नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह राज्य पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी दिवसभर राज्य पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदीर्घ विचारमंथन झाले. त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यानंतर परमबीर सिंगांसह एकूण ३३ जणांविरुद्ध बुधवारी अकोल्यात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणातील फिर्यादी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज रोहिदास घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार पाठवली होती. ही तक्रार तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालयातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिवसभर प्रदीर्घ मंथन केले. प्रकरण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असल्यामुळे अकोल्यात ‘झीरो क्राइम’ (गुन्हा दाखल) करून तो तपासासाठी ठाणे आयुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देण्यात आले.
गुन्हा दाखल करून तो वर्ग करेपर्यंत गोपनीयता बाळगण्याचेही आदेश देण्यात आले. त्यानंतर अकोला पोलीस दलातील धावपळ वाढली आणि बुधवारी रात्री १० वाजून ६ मिनिटांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ३३ जणांविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्र रचणे आणि ॲट्रॉसिटी अशा एकूण २७ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
पहाटेपर्यंत वरिष्ठांना रिपोर्टिंग
गुन्हा दाखल केल्यानंतर अकोला पोलीस अधीक्षकांनी त्या घडामोडींची माहिती संबंधित वरिष्ठांना पहाटेपर्यंत दिली. रात्री १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन सारखा ‘एंगेज’ होता.
आमचा रोल संपला
या संबंधाने आज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, ‘या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आता आमचा रोल संपला.’ अशी छोटेखानी प्रतिक्रिया दिली.