अकोल्याच्या शिक्षण संस्था चालकांची नागपुरात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 08:30 PM2023-02-17T20:30:05+5:302023-02-17T20:33:02+5:30
Nagpur News बँकेच्या संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावून गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप करत अकोला जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
नागपूर : बँकेच्या संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावून गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप करत अकोला जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी त्याचा उलगडा झाला. त्यानंतर संबंधित वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
अविनाश मनतकार (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावचे रहिवासी होते. अविनाश यांच्या पत्नी नयना मनतकार या भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते.
मनतकार यांच्या निकटस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनतकार हे तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. त्यांचा तेल्हारा येथे पेट्रोल पंपही होता. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित होते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी दुपारी मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात आले. दुपारी ३ च्या सुमारास अविनाश यांनी त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे आहे, असे म्हटले. त्यानंतर थोड्या वेळात येतो, असे सांगून ते ई - रिक्षाने निघाले. रात्र झाली तरी ते परतले नाही. त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. त्यामुळे नयना मनतकार यांनी आपल्या नातेवाईकांना अविनाश यांच्या 'मिसिंग'ची कल्पना दिली. दरम्यान, नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असताना मनतकार यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे कळले. या संंबंधाने बोलताना अविनाश मनतकर यांचे पूत्र अभिलाष यांनी म्हटले की, या प्रकरणामुळे वडिल प्रचंड व्यथित होते. त्यांना तेल्हारा येथील पेट्रोल पंप देखिल विकावा लागला होता.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांची धावपळ
गुरुवारी दुपारी मनतकार अजनी रेल्वे स्थानकावर पोहचले. तेथील फलाट क्रमांक १ वरून धडधडत निघालेल्या ट्रेन नंबर २२६९१ बेंगलुरु दिल्ली राजधानी एक्सप्रेससमोर त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी त्यांच्या कपड्याची तपासणी केली मात्र मोबाईल किंवा त्यांची ओळख पटविणारा कोणताही कागद किंवा वस्तू त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्या शर्टच्या कॉलरवर स्टाईल अकोला असा टेलरचा टॅग होता. त्यावरून रेल्वे पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. शुक्रवारी सायंकाळी मनतकार यांची ओळख पटली.
खळबळजनक सुसाईड नोट
मनतकार यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी स्वत:चा भ्रष्टाचार आमच्यावर लावून आम्हा पती-पत्नीला फसविले. या प्रकरणात संचालक मंडळ दोषी आहे की नाही, याची पोलिसांनी चाैकशी केली नाही. संचेती - लखानी यांनी दिलेल्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत त्यांनी लिहून ठेवले आहे. ही सुसाईड नोट व्हायरल झाल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस निरीक्षकावर ३८ लाख घेतल्याचा आरोप
या प्रकरणाचा तपास करताना रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पो. नि. शेळके यांनी ३८ लाख रुपये घेतले. मात्र, कसलीही मदत केली नाही, असेही मनतकार यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे. त्यामुळे मनतकार यांचे आत्महत्या प्रकरण आता कोणते वळण घेते, त्याकडे संबंधित वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.