माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!

By नरेश डोंगरे | Published: September 24, 2024 11:26 PM2024-09-24T23:26:03+5:302024-09-24T23:26:56+5:30

धोका पत्करण्याची गरज काय : अत्याधुनिक सुविधा उपलब्ध, कशाला हवा हा तामझाम

Akshay Shinde killed in police encounter case: Former Director General of Police said, this encounter would not have happened! | माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!

माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!

- नरेश डोंगरे

नागपूर : पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवून उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा, सुविधांचा वापर केला असता तर सध्या सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणारे बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर घडलेच नसते, असे परखड मत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. बहुचर्चित बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधाकंडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहे. यामुळे देशभर हे प्रकरण चर्चेला आले आहे. प्रत्येक जण वेगवेगळे मत मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी या एन्काऊंटरचे तटस्थ विश्लेषण केले.

ते म्हणाले, सध्या जगात डिजिटलायझेशनचा डंका वाजत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान समाजाच्या अन्य घटकांसोबतच न्यायव्यवस्था आणि पोलिसांचेही काम सुरळीत करून गेले आहे. गुन्हेगार कितीही मोठा असो की खतरनाक, त्याला पुर्वीसारखे न्यायालयात पेशीला घेऊन जाण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच मोठ्या कारागृहात व्हीडीओ कॉन्फरंसिंग (व्हीसी)ची सोय आहे. त्यामुळे संवेदशनिल प्रकरणातील आरोपीला कारागृहातूनच त्याला ऑनलाईन कोर्टात पेश करता येतं. या प्रकारात कसलाच धोका नसतो. मात्र, पोलीस ते सोडून, आरोपीला कारागृहात नेण्यासाठी विनाकारण तामझाम करतात.

संवेदनशिल गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी ८ ते १० पोलीस, स्वतंत्र वाहन लागते. वेळ जाते, उर्जा खर्ची पडते अन् सर्वात मोठे म्हणजे, त्यात मोठा धोका असतो. आरोपी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करतो, स्वत:वर हल्ला करून जखमी करून घेतो किंवा पोलिसांवर हल्ला करतो. नंतर आरोपाच्या फैरी झडतात. तर कधीबधी असे एन्काऊंटरचे प्रकार घडतात. या प्रकरणात नेमके काय झाले अन् कसे झाले, याबद्दल वेगवेगळे तर्क मांडणे, अंदाज काढणे स्वाभाविक आहे. मात्र, पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवत आरोपीला न्यायालयात नेण्याच्या भानगडीत न पडता त्याची कारागृहातूनच ऑनलाईन पेशी केली असती, तर हा प्रकारच घडला नसता, असेही दीक्षित म्हणाले.

प्रसंगी कोर्टाचे कामकाजही तुरुंगातच
नव्या भारतीय न्याय संहितेत डिजिटलयाझेशनचा (तंत्रज्ञानाचा) वापर व्हावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात, ईतकेच काय, आम्ही भारतातून परदेशातील कारागृहात असलेला २६/११ चा आरोपी डेव्हीड कोलमन हेडलीची साक्ष नोंदविली आहे. दुसरे म्हणजे, गरज वाटल्यास न्यायालयही तुरुंगात जाऊन कामकाज चालविते.

हा धोका असाच राहील
न्यायव्यवस्थेशी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी आताही पारंपारिकपणा सोडला नाही आणि प्रगत तंत्रज्ञानाचा उपरययोग केला नाही तर ही 'एन्काऊंटर'सारख्या प्रकाराचा धोका, असाच कायम राहिल, असेही मत दीक्षित यांनी नोंदविले आहे.
 

Web Title: Akshay Shinde killed in police encounter case: Former Director General of Police said, this encounter would not have happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.