यंदाही लॉकडाऊनमध्ये अक्षयतृतीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:04+5:302021-05-10T04:08:04+5:30

नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षयतृतीया सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी चांगला मुहूर्त ...

Akshay Tritiya in lockdown again this year | यंदाही लॉकडाऊनमध्ये अक्षयतृतीया

यंदाही लॉकडाऊनमध्ये अक्षयतृतीया

Next

नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षयतृतीया सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी चांगला मुहूर्त असल्याने नवीन वाहन खरेदी, प्लॉट व फ्लॅट खरेदी, नवीन वास्तूत गृहप्रवेश, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा १४ मे रोजी अक्षयतृतीया साजरी होणार आहे. पण यावर्षीही कोरोनाचे विध्न आडवे आले आहे. दुकाने बंद असल्याने ग्राहक नवीन वस्तूंची खरेदी करणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

अक्षयतृतीयेवर लोक सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदीही करतात. या दिवशी सोने खरेदी केल्यास संपत्तीत वाढ होते, असे मानले जाते. पण यंदाही गुढीपाडव्याप्रमाणे अक्षयतृतीयेला लोकांना सोने-चांदीची खरेदी करता येणार नाही. सराफा व्यावसायिक राजेश रोकडे म्हणाले, गुढीपाडव्याला दुकाने सुरू ठेवण्याची मनपा आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. पण त्यांनी दिली नाही. आताही परवानगी मिळणार नाही. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुहूर्ताचा दिवस व्यवसायाविना जाणार आहे. या दिवशी दागिने विक्रीसाठी अनेक सराफा व्यावसायिक दागिन्यांचे ऑर्डर देतात, पण दुकाने बंद असल्याने कुणीही ऑर्डर दिला नाही त्याचा फटका लहानमोठे सराफा व्यावसायिक आणि कारागिरांना बसणार आहे.

आदित्य हिराचे डॉ. पी. के. जैन म्हणाले, या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन वाहनांची खरेदी करतात. पण यावर्षी ग्राहकांनी नवीन गाड्यांची नोंदणी केली नाही. ग्राहक लॉकडाऊन उघडण्याची वाट पाहात आहेत. यावर्षीही ऑटोमोबाइल क्षेत्राला नुकसान सोसावे लागणार आहे. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले, या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी लोक गर्दी करतात. पण दुकाने बंद असल्याने लोकांना खरेदी करता येणार नाही. गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जास्त विक्री होते. व्यावसायिकांना यंदाही नुकसान सोसावे लागणार आहे. क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष विजय दर्गण म्हणाले, यंदा अक्षयतृतीया सण कोरोनात जाणार आहे. लॉकडाऊनपासून ग्राहक नवीन घरांच्या खरेदीसाठी विचारणा करीत नाहीत. त्यामुळे अनेक बांधकाम थांबले आहेत. लॉकडाऊनचा फटका बांधकाम क्षेत्राला फटका बसला आहे.

सामूहिक विवाह होणार नाहीत

अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर सर्वच समाजात सामूहिक विवाह होतात. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला अनेक जोडप्यांचे शुभविवाह या दिवशी पार पडतात. त्यांना जीवनावश्यक वस्तू समाजातर्फे दिल्या जातात. यानिमित्ताने सर्वच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक विवाह होणार नसल्याने सर्वांचेच नुकसान होणार आहे.

Web Title: Akshay Tritiya in lockdown again this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.