अक्षयतृतीयेला होणार ऑनलाईन सोन्याच्या नाण्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:02+5:302021-05-14T04:08:02+5:30
नागपूर : दुकाने बंद असताना सराफांनी ऑनलाईन सोने विक्रीची योजना आणली आहे. या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळत नसला ...
नागपूर : दुकाने बंद असताना सराफांनी ऑनलाईन सोने विक्रीची योजना आणली आहे. या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळत नसला तरीही शुक्रवार, १४ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर २५ टक्के व्यवसाय होण्याची सराफांना अपेक्षा आहे. दागिने प्रत्यक्ष पाहून खरेदीची ग्राहकांची मानसिकता असल्याने दागिन्यांऐवजी नाण्यांच्या खरेदीवर जास्त भर राहणार आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊननंतर स्टोअर बंद असल्याने ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा नवीन ट्रेंड दिसून येत आहे.
व्यावसायिक राजेश रोकडे म्हणाले, अक्षयतृतीयेनिमित्त अनेक सराफांनी ऑनलाईन दागिने आणि सोने विक्रीची योजना आणली आहे. ग्राहकांनी बुकिंग केले आहे. दुकाने बंद असल्याने अनेकांना दागिने घरपोच दिली जाणार आहेत. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढेही योजना सुरू राहणार आहे.
व्यावसायिक पुरुषोत्तम कावळे म्हणाले, दागिन्यांऐवजी सोने-चांदीच्या नाण्यांमध्ये जास्त गुंतवणूक करीत आहेत. लॉकडाऊननंतर शेअर बाजारात अस्थिरता असल्याने सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम दिसत आहे. पुढे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. सध्या सोन्याचे भाव ४७,५०० रुपयांपुढे आणि चांदी ७१ हजारांवर पोहोचली आहे. जानेवारीत सोने ५० हजारांवर गेल्यानंतर सोन्याचे दर कमी झाले. त्यानंतर पुन्हा वाढले. याच कारणांनी ग्राहक सोन्यात जास्त गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये कोरोनामुळे अस्थिरता असतानाही एमसीएक्स गोल्ड मार्केटमध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे.
दागिन्यांमध्ये ‘टच अॅण्ड फिल’ला पसंती
अनेक मोठ्या शोरूमनेही ग्राहकांसाठी ऑनलाईन विक्रीची योजना आणली आहे. या योजनेत ग्राहक नाणे खरेदी करतात, पण दागिने नाहीत. कारण दागिन्यांना जोपर्यंत हात लावत नाही आणि घालून पाहत नाहीत, तोपर्यंत ग्राहक खरेदी करीत नाहीत. गेल्या वर्षीपासून दागिन्यांचा व्यवसाय मंदीत आहे. लग्नकार्य नसल्याने केव्हा सुरळीत होईल, हे सांगता येणार नसल्याचे सराफांनी सांगितले.