अक्षयतृतीयेला होणार 'अक्षय' खरेदी; सराफा, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 08:30 PM2023-04-19T20:30:25+5:302023-04-19T20:31:10+5:30
Nagpur News साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयानिमित्त सर्व बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. नागरिकही खरेदीसाठी सज्ज झाले आहेत.
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयानिमित्त सर्व बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. नागरिकही खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. सोने-चांदीचे दर चढे असले तरीही लोकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. गुढीपाडव्याला लोकांनी बंपर खरेदी केली. आता अक्षयतृतीयेलादेखील सर्व बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
सराफा बाजारात उत्साह
शनिवार, २२ एप्रिल अक्षयतृतीयेला १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ६१ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. बुधवारी सोने ६०,६०० आणि किलो चांदीचे दर ७५,३०० रुपये होते. गेल्यावर्षी सोने ५२,५०० आणि पाच वर्षांआधी सोन्याचे दर ३१,५०० रुपये होते. पाच वर्षांत सोन्याचे दर जवळपास दुपटीवर गेले आहेत. सराफांनी काही दिवसांआधी सोन्याचे नाणे आणि दागिन्यांचे बुकिंग सुरू केले असून डिलिव्हरी अक्षयतृतीयेला देणार आहे. नागपूर शहरात २ हजारांपेक्षा जास्त दुकाने आणि २५ मोठ्या शोरूम आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. हिऱ्याच्या दागिन्यांवर शून्य मेकिंग चार्ज तर सोन्याच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. गुंतवणूक म्हणूनही लोक सोने खरेदी करतील. शनिवारी इद असल्यामुळे मुस्लिम बांधवदेखील सोनेखरेदी करतील. यादिवशी ५० कोटींहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकानी वर्तवला आहे.
रिअल इस्टेटमध्येही चहलपहल
अक्षयतृतीयेला अनेकजण नवीन गोष्टींची सुरुवात करतात. या शुभमुहूर्तावर गृहखरेदी केल्यास सुख, शांती आणि यश मिळते, असा लोकांचा समज आहे. यादिवशी गृहप्रवेश करणेही शुभ समजले जाते. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी भरघोस सूट, आकर्षक पेमेंट योजना अशा ऑफर्स देऊ केल्या आहेत. याशिवाय सरकारी धोरण, गृहकर्जावरील कमी व्याजदर यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक चित्र पाहायला मिळेल. अनेकजण आपल्या 'ड्रीम होम'चे स्वप्न पूर्ण करतील आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल होईल, अशी आशा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
इलेक्ट्रॉनिक आणि वाहन खरेदीवर भर
शुभमुहूर्त पाहून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या दिवशी नागरिक विविध योजनांचा फायदा घेऊन इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी मोठ्या आकारातील वस्तूंचे बुकिंग केल्याचे संचालकांनी सांगितले. बुकिंग आधी करून वाहन घरी नेण्याची प्रथा आहे. अनेकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे आधीच बुकिंग केले आहे. यंदा इलेक्ट्रिक वाहनांचा टक्का वाढणार आहे. या बाजारात कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज आहे.