नागपुरात अक्षयतृतीयेच्या पर्वावर बाजारात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:24 AM2018-04-18T00:24:23+5:302018-04-18T00:24:36+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती. या मुहूर्तावर अनेक लग्नही होत असतात. त्यानिमित्ताने दागिने, कपड्यांचीही जोरदार खरेदी झाली. व्यापाऱ्यात अचानक तेजी आल्याने विक्रेत्यांचेही चेहरे खुलले. उद्या प्रत्यक्ष अक्षयतृतीयेच्या दिवशी खरेदीचा हा आलेख आणखी उंचावण्याची शक्यता या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. इतवारी सराफा बाजार, महाल, शंकरनगर, गोकुळपेठस्थित मोठ्या ज्वेलरी शोरुममध्ये अक्षयतृतीयेसाठी दागिन्यांची विशेष रेंज आणि कलेक्शन ठेवण्यात आले आहे. सोबतच या दुकानांमध्ये आकर्षक आॅफर आणि बनवाई शुल्कातही सूट दिली जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी आज दिवसभर या दुकानांमध्ये भीड होती. इतवारी भांडेओळीमध्ये ठोक भांडेबाजारासह संपूर्ण शहरात भांड्यांची खूप विक्री झाली. कपड्यांमध्ये साडी, शेरवानी, सूट खरेदीसाठीही बर्डी मेनरोड, इतवारी, सदर, खामला, गोकुळपेठ या भागातील गारमेंट्स शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होती. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लग्न शुभ समजले जाते. म्हणून घोडी, बग्गी, बॅण्ड, कॅटरिंग, सभागृह सज्ज ठेवण्यात आले होते.
वाहनांची बम्पर विक्री
अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वाहनांची बम्पर विक्री झाली. हा मुहूर्त लक्षात घेऊन शहरातील दुचाकी, चारचाकी विक्रेत्यांनी जोरादार तयारी केली होती. आधीच बुकिंग झालेल्या वाहनांची डिलिव्हरी उद्या अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर केली जाईल. आॅटोमोबाईल कंपन्या आणि त्यांच्या डीलर्सनी यासाठी विशेष आॅफर्स आणि सूट जाहीर केली. मोबाईल मार्केटमध्येही अक्षयतृतीयेचा परिणाम स्पष्ट दिसत होता.