अक्षयकुमार काळे यांना साहित्य अकादमी पुरस्कार
By admin | Published: March 20, 2016 03:00 AM2016-03-20T03:00:58+5:302016-03-20T03:00:58+5:30
विख्यात काव्य समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांना महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सेतूमाधवराव पगडी पुरस्कार बुधवारी होणार प्रदान
नागपूर : विख्यात काव्य समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांना महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘गालिबचे उर्दु काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार २३ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयासमोर, मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. या ग्रंथासाठी सातत्याने पाच वर्षे आपण परिश्रम केले. या ग्रंथाला रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या तर या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली आहे आणि दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार सुरू आहे. उर्दु आणि मराठीची सेवा करण्यासाठी हा पुरस्कार मला मिळाला. याशिवाय केलेल्या परिश्रमाचा आदर या पुरस्कारामुळे झाल्याचे मला समाधान आहे, अक्षयकुमार काळे म्हणाले. गालिबच्या नावाने अनेक शेर खपविले जातात. अनेकांनी गालिबचे शेर वाचलेलेच नसतात त्यामुळे गालिबच्या शेरोशायरीबद्दल अनेकांमध्ये गोंधळ उडतो. सरधोपट गालिबच्या नावावर शायरी खपविली जाते. या पुस्तकामुळे मात्र गालिबच्या नावावर काहीही खपविले जाऊ शकत नाही. गालिबचे शेर या पुस्तकाच्या माध्यमातून सहज ओळखले जाऊ शकतात. कारण या पुस्तकात रदीफनुसार सूची देण्यात आली आहे. कुठल्या गझलेचा तो शेर आहे, हे देखील या सूचीतून ओळखता येते. यानंतर गालिब चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथ सध्या लिहित आहेत, असे मत त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. (प्रतिनिधी)