लुप्तप्राय होणाऱ्या वनस्पती जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:49 AM2020-10-06T11:49:40+5:302020-10-06T11:51:25+5:30
biodiversity Nagpur News महाराष्ट्रातून अनेक वनस्पती प्रजाती लुप्त होत चालल्या आहेत. मात्र जैवविविधतेसाठी ही धोक्याची घंटा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातून अनेक वनस्पती प्रजाती लुप्त होत चालल्या आहेत. मात्र जैवविविधतेसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सावध राहावे, या प्रजाती वाचवाव्या आणि आपल्या वसुंधरेला वाचवावे, असे कळकळीचे आवाहन वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित वन विभागाच्या वेबिनारमध्ये पाचव्या दिवशी करण्यात आले.
आपल्या वनसंपत्ती संसाधनाचे संवर्धन हा सोमवारच्या वेबिनारचा विषय होता. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी पश्चिम महाराष्ट्रातील धोकाग्रस्त वनस्पती प्रजातीचे संवर्धन आणि वनविभागाची भूमिका या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी ७२ नवीन वनस्पती प्रजाती शोधून काढल्या असून, ८ वनस्पतीना त्यांचे नाव देण्यात आले आहे. दुर्मिळ वनस्पती, पश्चिम घाटाचे अनन्यसाधारण महत्त्व, विलुप्त होत असलेल्या प्रजाती, त्यांच्या संवर्धनासाठी बियाणे संकलन व साठा तयार करणे, शिवाजी विद्यापीठातील रोपवाटिका व रोपवने, जैवविविधता, जैवविविधता उद्यान, संवर्धनाचे धोरण व उद्दिष्ट, संवर्धनाची उपाययोजना इत्यादी विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
एम.आय.टी. पुणे येथील प्राध्यापक डॉ. अपर्णा वाटवे यांनी ‘पठारावरील परिस्थिती : महत्त्व आणि धोके’ या विषयावर सादरीकरण केले. महाराष्ट्रातील पठार, त्यांमध्ये आढळणाºया वनस्पती, प्रदेशनिष्ठ वनस्पती, दुर्मिळ व धोक्यात असलेल्या वनस्पती, चिरेखाणी, बॉक्साईंट उत्खननामुळे पठाराला होणारे नुकसान इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. मंदार दातार, प्राध्यापक, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ येथील प्रा.डॉ. मिलिंद सरदेसाई यांनीही आपला विषय मांडला. आॅर्किडस, कीटक भक्षी प्रजाती, बांबू प्रजाती, संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय स्तरावर कास पठारात काम करणारे श्रीरंग शिंदे वनपाल व उमरेड पवनी-करांडला अभयारण्यातील वनपाल नीलेश्वर वाडीघरे यांनी अनुभव सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी संबंधित विषयांबाबत त्यांचे अनुभव सांगून मार्गदर्शन केले. संचालन व आभार पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी मानले.