नागपुरात शिवालयांमध्ये गुंजला हर हर महादेवचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:04 PM2019-03-04T22:04:50+5:302019-03-04T22:42:23+5:30

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. सोमवार व सर्वार्थसिद्धी योग आल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व होते. पहाटे ३ वाजतापासून शिवमंदिरात पूजाअर्चना सुरू झाली होती. मंदिरातून रुद्राभिषेकाचा ध्वनी गुंजत होता. सकाळ होताच श्रद्धाळू दर्शनासाठी मंदिरात तयार होते. आरती, भजन, कीर्तन, ओम नम: शिवायचा गजर शिवालयात दिवसभर सुरू होता. महादेवाच्या पिंडीला आकर्षक सेज करण्यात आली होती. मंदिरांमध्ये प्रसादाचे वितरण, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पौराणिक मंदिर असलेल्या कल्याणेश्वर, तेलंगखेडी, जागृतेश्वर, पाताळेश्वर, विश्वेश्वर मंदिरांमध्ये रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. शहरातील दहन घाटांवरही महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे रूप आले होते.

Alarm Har Har Mahadev in Nagpur's Shivalayas | नागपुरात शिवालयांमध्ये गुंजला हर हर महादेवचा गजर

श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडी व श्री अलख निरंजन नागद्वार स्वामी सेवा मंडळ कोराडी द्वारा आयोजित महाशिवरात्री यात्रा महोत्सवादरम्यान राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादेवाचे दर्शन घेतले.

Next
ठळक मुद्देपहाटेपासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दीउसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेकशिवालयाच्या परिसराला जत्रेचे रूप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. सोमवार व सर्वार्थसिद्धी योग आल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व होते. पहाटे ३ वाजतापासून शिवमंदिरात पूजाअर्चना सुरू झाली होती. मंदिरातून रुद्राभिषेकाचा ध्वनी गुंजत होता. सकाळ होताच श्रद्धाळू दर्शनासाठी मंदिरात तयार होते. आरती, भजन, कीर्तन, ओम नम: शिवायचा गजर शिवालयात दिवसभर सुरू होता. महादेवाच्या पिंडीला आकर्षक सेज करण्यात आली होती. मंदिरांमध्ये प्रसादाचे वितरण, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पौराणिक मंदिर असलेल्या कल्याणेश्वर, तेलंगखेडी, जागृतेश्वर, पाताळेश्वर, विश्वेश्वर मंदिरांमध्ये रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. शहरातील दहन घाटांवरही महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे रूप आले होते.
जागृतेश्वर देवस्थान ट्रस्ट
जागनाथ बुधवारी येथील स्वयंभू श्री जागृतेश्वर देवस्थानात साडेसात शिवलिंग आहे. नागपूरनगर देवता म्हणून जागृतेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. पुरातण काळात ग्रामदेवता म्हणून हे देवस्थान ओळखल्या जायचे. ५०० वर्षे जुने हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात साडेसात स्वयंभू शिवलिंग असल्याने महाशिवरात्रीला येथे जत्रेचे रूप येते. या मंदिरात १६४ वर्षापासून मोठे आरती मंडळ तीन तासाची आरती करते. रात्री १ वाजता आरती झाल्यानंतर मंदिराचे द्वार बंद करण्यात येते. सोमवारी पहाटे ३.३० वाजता मंदिरात अभिषेक करण्यात आला. भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसादात साबुदाण्याची खिचडी व राजगिऱ्याचा लाडू देण्यात आला. या उत्सवाच्या आयोजनात ट्रस्टचे वसंतराव पौनीकर, विजय पाठराबे, छोटुभैया सारडा, सुनील धोटकर, रवींद्र रंभाड, वसंता फुलवाले, सत्तुभैया सारडा, विनायकराव गोड्डे यांचे सहकार्य लाभले.
श्री कल्याणेश्वर शिवमंदिर, तेलंगखेडी
सतराव्या शतकातील भोसलेकालीन मंदिर म्हणून तेलंगखेडी येथील श्री कल्याणेश्वर शिवमंदिर प्रसिद्ध आहे. पुरातन आणि जागृत मंदिर असल्याने महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. पहाटे ३ वाजता शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. ४ वाजता आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वितरित करण्यात आले. मंदिरातील शिवरात्र उत्सवाचे संपूर्ण आयोजन आशुतोष शेवाळकर व आशिष पेढेकर व ४० स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
श्री सद्गुरू सिद्धारूढ शिवमंदिर
श्री सद्गुरु सिद्धारूढ अध्यात्म समितीच्या सिद्धारूढ शिवमंदिरात सकाळी रुद्राभिषेक करण्यात आला. दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले. कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वेश्वर महादेव देवस्थान
गांधीसागर तलावाजवळील विश्वेश्वर महादेव देवस्थान हे अतिशय प्राचिन मंदिर आहे. २१५ वर्षापूर्वी मंदिराची निर्मिती झाली होती. शिवरात्रीनिमित्त मंदिरात अभिषेक, आरती, भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मंदिरात सामूहिक अभिषेक करण्यात आला. रात्री उशिरापर्र्यंत भाविकांनी दर्शन घेतले. वेदप्रकाश जैस्वाल व वसंतलाल जैस्वाल यांच्या सहकार्याने मंदिरात महाशिवरात्रीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ बालाजीनगर
बालाजीनगर विस्तारमधील गजानन महाराज मंदिरातून महाशिवरात्रीला भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येते. ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळातर्फे पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी बर्फाचे भव्य शिवलिंग तयार करण्यात आले होते. पालखीत सहभागी भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यात माणिकराव घोरमोडे, मनोहर मोटघरे, सुधाकरराव भिंगारे, लक्ष्मण मानकर, गोविंदराव ढोक, विठ्ठलराव सांडे, विजय आडोकार, दत्तू वाघाडे, प्रवीण मानकर, केशव डोमकोंडवार, सुरेश फुले, संजय धुर्वे आदींचे सहकार्य लाभले.
कल्याणेश्वर मंदिर, महाल
महाल येथील कल्याणेश्वर शिवमंदिरात रात्री २ वाजतापासून अभिषेकाला सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुलांच्या सेजने सजविण्यात आले. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री ११ वाजता पुन्हा महादेवाचा अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर मंदिरात दत्तकृपा प्रासादिक महिला मंडळाने सकाळी १० ते रात्री १० पर्यंत रुद्रपाठ केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी येणाºया भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाचे वितरण चंद्रलाल कारिया व रमेश तन्ना यांच्या नेतृत्वात करण्यात आले. मंदिर समितीकडून भाविकांना गाजराचा शिरा प्रसाद रुपात वितरित करण्यात आला. शिवरात्री उत्सवाला यशस्वी करण्यासाठी सुशील खोब्रागडे, अजय पाठक, गुणवंतराव पाटील, विकास आगलावे, विजय साखरकर, अशोक डुबले, अनिता दार्वेकर, हर्षिका साखरकर, वैशाली खोब्रागडे, शालिनी काटोले, जयश्री चौधरी, वैशाली पिंजरकर, मंगला महाजन, बाली पराते, चित्रा डुमले आदींचे सहकार्य लाभले.
श्री शिवमंदिर सेवा संस्था, मोठा इंदोरा
येथे महाशिवरात्रीनिमित्त महाअभिषेक करण्यात आला. सकाळी ६.३० वाजता पूजा व महाआरती झाल्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. रामायणाचा पाठ व भजन, कीर्तन झाले. महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष परमेश्वरलाल शर्मा, कृष्णकुमार पांडे, ओम हरिरामानी, टी.जी.अरोरा, अमरलाल जेसवानी, रविकांत हरडे, नरेश इंगळे, साजनदास सचदेव, पवन चौधरी, श्रीचंद कुकरेजा, रमेश वासवानी, अशोक जेसवानी, बंडू टेंभुर्णे, ठाकुरदास जग्यासी, कालू हरचंदानी, राजू सावलानी, राजू इसरानी, प्रकाश भाटिया, अशोक जैस्वानी आदींचे सहकार्य लाभले.
शिवभक्त मित्र मंडळ
इतवारी येथे शिवभक्त मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त ठंडाईचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, सरला नायक, दुनेश्वर पेठे, अतुल कोटेचा, रवींद्र पैगवार, अजय टक्कामोरे, माधुरी बालपांडे, राजेश नंदवार, दिलीप गांधी, मुन्ना लखेटे, महेश श्रीवास, ओम गुप्ता, कमलेश नायक, रिंकू जैन, सुनील धोटकर, राजू पालीवाल, गजेंद्र पांडे, प्रशांत गुप्ता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश जैन, रितेश शर्मा, विक्की जैन, प्रदीप जैन, राजू पारेख, भरत सोनी, लोकेश टक्कामोरे, हितेश जैन आदींचे सहकार्य लाभले.
झुलेलाल मंदिर
गांधीसागर येथील झुलेलाल मंदिर परिसरात सिंधू झुलेलाल वेलफेअर सोसायटीचे ठाकूर मोहनदास यांच्या सहकार्याने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सकाळी महादेवाच्या पिंडीला १०८ बेलपत्री अर्पण करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन झाले. आरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले.
हरिहर मंदिर
भंडारा रोड येथील हरिहर मंदिरात मंडळाचे अध्यक्ष अर्जुनराव वैरागडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवधाम
हावरापेठ येथील शुक्लानगरातील शिवधाम येथे दोन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या पहाटेला अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. दुपारी भजन मंडळांनी भजने सादर केली. सायंकाळी ६.३० वाजता आरती झाली. मंगळवार, ५ मार्च रोजी हभप शांताराम ढोले महाराजांचे गोपालकाल्याचे कीर्तन होणार आहे.
शनिमंदिर कळमना
कळमना येथील वैष्णोदेवीनगरातील नवग्रह शनिमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महादेवाबरोबरच नवग्रहाची पूजा पंडित नीलेश शर्मा यांच्याहस्ते करण्यात आली. मंगळवार ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवग्रह शांती पाठ व महाआरती करण्यात आली.
बेलीशॉप प्राचीन शिवमंदिर
बेलीशॉप मोतीबाग रेल्वे कॉलनी कामठी रोड येथील प्राचीन श्री शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ३ वाजता प्रवीण डबली, डॉ. युगेश्वरी डबली, एम. रामाराव व पंडित कृष्ण मुरली पांडेय यांच्या उपस्थितीत सामूहिक रुद्राभिषेक करण्यात आला. रुद्रपाठ पं. राजेश द्विवेदी यांनी केला. सकाळी ६ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर सुरू झाले. दुपारी १२ वाजता पप्पी वर्मा, चंचल शर्मा व महिलांनी सुंदरपाठाचे सादरीकरण केले. दुपारी महिला मंडळाचे जसगायन झाले. द.पू.म. रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त पांडेय, नवनीतसिंह तुली यांनी पूजा केली. संदीप सहारे व मित्रमंडळाद्वारे २०० लिटर दुधाचे वितरण केले. ५ मार्च रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. वीरेंद्र झा, पी. सत्याराव, जुगलकिशोर शाहू, अ‍ॅड. राजेश सहगल, पी. कन्याकुमारी, पुष्पा नागोत्रा, सरस्वती स्वामी, विलास खाडे, सुरेंद्र नागोत्रा, पी. गुरुनाथ यांचे सहकार्य लाभले.
 

 

Web Title: Alarm Har Har Mahadev in Nagpur's Shivalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.