नागपुरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात छत्रपतींचा राज्याभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 07:16 PM2019-06-15T19:16:16+5:302019-06-15T19:23:50+5:30

भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत महालच्या शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न झाला.

In the alarm of Jai Bhavani ,Jai Shivaji , Chhatrapati coronation celebrated at Nagpur | नागपुरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात छत्रपतींचा राज्याभिषेक

राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना महापौर नंदा जिचकार, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, येसाजी कंक

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी पुतळ्याजवळ रंगला सोहळा : तलवारबाजी, दांयपट्टा अन् लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत महालच्या शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न झाला. 


सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, मुधोजी राजे भोसले, शिवाजी महाराजांच्या सरदारात मानाचे स्थान असलेले येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक उपस्थित होते. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अभिषेक केला. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सहा सदस्यांचे लग्न झाल्यामुळे त्यांना सपत्नीक अभिषेक करण्याचा मान देण्यात आला. राज्याभिषेक सोहळ्यासाठी श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य विशाल देवकर, अभिषेक सावरकर यांनी मोटरसायकलने प्रवास करून ३६ किल्ल्यांवरील माती आणि पाणी खास राज्याभिषेक सोहळ्यासाठी आणले होते. माती व पवित्र पाणी यांचा जलाभिषेक यावेळी करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आरती केल्यानंतर शिवकालीन क्रीडा, प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली.   
                            भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवतींनी ढोलताशांच्या निनादात भगवा नाचविला. त्यानंतर युवक-युवतींनी तलवारबाजी, दांडपट्टा अन् लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. प्रात्यक्षिके सुरू असताना ड्रोनद्वारे या समारंभावर पुष्पवर्षाव करण्यात येत होता. राज्याभिषेक सोहळ्याचा विधी गोविंद शास्त्री पडगावकर यांनी पार पाडला. यशस्वीतेसाठी श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे दत्ता शिर्के, प्रवीण घरजाळे, जय आसकर, पंकज धुर्वे, पंकज पराते, रूपेश चकोले, नीतेश बडवाईक, रितेश गाढवे, विजू राजूरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रायगड, प्रतापगड अन् शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी गर्दी
राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने सोहळ्याच्या ठिकाणी रायगड, प्रतापगड आणि शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती हुबेहुब साकारण्यात आली होती. हे किल्ले पाहण्यासाठी शिवप्रेमींनी एकच गर्दी केली. राज्याभिषेकासाठी तयार केलेला ८ फुटांचा जिरेटोपही येथे ठेवण्यात आला होता, तर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला शिवप्रेमींनी प्रतिसाद दिला.

Web Title: In the alarm of Jai Bhavani ,Jai Shivaji , Chhatrapati coronation celebrated at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.