पांजरा (काटे) येथे विठ्ठल नामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:05+5:302021-07-21T04:08:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : आषाढी एकादशीनिमित्त पांजरा (काटे) (ता. काटाेल) येथील वारकरी दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे. काेराेना संक्रमणामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : आषाढी एकादशीनिमित्त पांजरा (काटे) (ता. काटाेल) येथील वारकरी दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे. काेराेना संक्रमणामुळे त्यांची पंढरपूर वारी हुकली. मात्र, येथील वारकऱ्यांनी ही बाब मनाला लावून न घेता गावात पूजा करून दिंडी काढली. दिंडीतील विठ्ठल नामाच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय झाले हाेते.
पांजरा (काटे) हे गाव वारकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीने पंढरपूरची वारी केली आहे. येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयाेजन केले जायचे. त्या सप्ताहात राज्यभरातील माेठमाेठे कीर्तनकार कीर्तनासाठी यायचे. येथील वारकरी दरवर्षी आषाढी व कार्तिक एकादशीला पंढरपूरची वारी करायचे. काेराेना महामारीमुळे त्यांची पंढरपूर वारीची संधी सलग दुसऱ्या वर्षीही हुकली. वारीची परंपरा खंडित झाल्याची खंत वारकऱ्यांना हाेती. परंतु, त्यांचा नाईलाज हाेता.
वारकऱ्यांनी मंगळवारी टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयजयकार करीत गावातच दिंडी काढली. कोरोनाचे संकट लवकरच संपू दे, असे विठुरायाला साकडेही घातले. एवढेच नव्हे तर, सर्वांनी लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहनही वारकऱ्यांनी केले. या दिंडीत मनोहर सरोदे, मुरली मानकर, जगन्नाथ सरोदे, भुते गुरुजी, संजय सावरकर, मधुकर नागोसे, एकनाथ सावरकर, प्रवीण भिवगडे, विलास राऊत, उमेश धर्मे, प्रशांत खंते, राहुल कोचे, ईश्वर नागोसे यांच्यासह गावातील वारकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
...
‘.... वारी चुकू न दे हरी’
‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा ध्यास, पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी’ म्हणत वारकरी दिंडी काढायचे. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’चा जयघाेष करीत भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांना पंढरपूरला रवाना करायचे. हे चित्र काेराेनाने दुसऱ्याही वर्षी हिरावून घेतले.