दक्षिण एक्स्प्रेसमधून दारूच्या बाटल्या जप्त
By admin | Published: March 2, 2015 02:33 AM2015-03-02T02:33:56+5:302015-03-02T02:33:56+5:30
होळीनिमित्त हिंगणघाटला घेऊन जात असलेल्या ६ हजार १६० रुपये किमतीच्या दारूच्या १४० बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसमधून जप्त केल्या आहेत.
नागपूर : होळीनिमित्त हिंगणघाटला घेऊन जात असलेल्या ६ हजार १६० रुपये किमतीच्या दारूच्या १४० बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसमधून जप्त केल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ओमप्रकाश सेलुटे, विलास झोडापे, विराज मते, नरेंद्र चौधरी, विजय तायवाडे, संतोष चौबे, जितेंद्र लोखंडे यांनी प्लॅटफार्म क्रमांक २ वर सापळा रचला. दक्षिण एक्स्प्रेस येताच गाडीच्या मध्यभागी असलेल्या जनरल कोचची तपासणी केली. त्यात आरोपी सुदेश बनवारीलाल जाठ (५३) आणि उमेश बनवारीलाल जाठ (३१) रा. कंजर मोहल्ला, ता. घमापूर जि. जबलपूर हे ९० मिलिलिटरच्या १४० बाटल्या कॉलेज बॅग आणि लगेज बॅगमधून घेऊन जाताना दिसले. ते मुलताई ते हिंगणघाट असा प्रवास करीत होते. त्यांना पकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या विरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्यामुळे होळीसाठी आणखी दारूची तस्करी होण्याची शक्यता असून पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)