दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:38 PM2018-09-26T22:38:10+5:302018-09-26T22:39:04+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने सलग १९ व्या दिवशी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करीत दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटख्याची तस्करी पकडली.
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने सलग १९ व्या दिवशी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करीत दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटख्याची तस्करी पकडली.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, होतिलाल मीणा, दिनेश सिंह, शशिकांत गजभिये, विकास शर्मा, विवेक कनोजिया, अर्जुन सामंतराय, जाहीद खान हे सायंकाळी ६ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. त्यांना जनरल कोचमध्ये तीन बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात १०,४०० रुपये किमतीच्या दारूच्या ४०० बॉटल्स आढळल्या. दुसऱ्या घटनेत याच गाडीत समोरील जनरल कोचमध्ये सीटखाली एक पांढऱ्या रंगाचे पोते आढळले. हे पोतेही आपले नसल्याचे आजूबाजूच्या प्रवाशांनी सांगितले. तपासणी केली असता त्यात १०,१२५ रुपये किमतीची गुटख्याची ७५ पाकिटे आढळली. त्यानंतर निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी जप्त केलेला गुटखा मुख्य आरोग्य निरीक्षकांकडे तर दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केली.