मद्य शौकिनांना लवकरच मिळणार दारू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 10:28 AM2020-05-14T10:28:23+5:302020-05-14T10:28:43+5:30
दारूची ऑनलाईन डिलिव्हरी होणार असल्याचे ऐकून मद्य शौकिनांना आनंद झाला असला तरी त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते.
धीरज शुक्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूची ऑनलाईन डिलिव्हरी होणार असल्याचे ऐकून मद्य शौकिनांना आनंद झाला असला तरी त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते. महापालिका आयुक्तांच्या ऑनलाईन डिलिव्हरीच्या आदेशानंतर वाईन शॉपच्या मालकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांनुसार १४ किंवा १५ मेपर्यंत हे आदेश मिळतील. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मार्गदर्शक तत्त्वे जारी होतील. विक्री कशी करावी आणि नियमांचे पालन कसे करावे हे वाईन शॉपचे मालक ठरवणार आहेत. त्यानंतरच शहरातील १२५ दुकानातून मद्य शौकिनांपर्यंत दारू पोहोचू शकणार आहे.
नागपूर लिकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. लवकरच याबाबत आदेश मिळतील, अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. होम डिलिव्हरीसोबत दुकानेही सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. आपण पूर्णपणे शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करू, असे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ग्राहक मोठ्या संख्येने आले तरी १-२ दिवसात स्थिती सामान्य होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अॅपवरून विक्री वाईन शॉप मालकांना वाटते कठीण
कोणत्याही अॅपच्या मदतीने दारूची डिलिव्हरी करणे वाईन शॉपच्या मालकांना कठीण वाटत आहे. डिलिव्हरी बॉईजचे आरोग्य आणि त्यांच्याकडून नियमांचे पालन होईल की नाही याची शाश्वती घेतल्या जाऊ शकत नाही. त्या ऐवजी दुकानातील कर्मचाऱ्यांना हे काम दिले जाऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते होम डिलिव्हरीसाठी मोबाईल क्रमांक जारी करण्याबाबत मागणी करीत आहेत.
काढावा लागू शकतो ऑनलाईन परवाना
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार परवाना सक्तीचा केल्या जाऊ शकतो. असे झाल्यास कायमचा परवाना मिळविण्यासाठी मद्य शौकिनांना वाट पाहावी लागु शकते. काही शुल्क देऊन एका दिवसाचा परवाना वाईन शॉपचे मालक देऊ शकतात. त्यास ऑनलाईनही मिळविता येऊ शकणार आहे.
दुकाने सुरू करावी लागतील
‘दारूच्या विक्रीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मिळाला नाही. एक-दोन दिवसात याबाबत सूचना मिळतील. अॅपच्या मदतीने डिलिव्हरी केल्या जाऊ शकत नाही. दुकानाच्या कर्मचाऱ्यांनाच हे काम सोपवावे लागेल. आम्ही दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाला मागितली आहे. यामुळे गर्दी नियंत्रित करून योग्य व्यवस्था ठेवण्यास मदत होईल.’
- रामकुमार मोटघरे, अध्यक्ष, नागपूर लिकर असोसिएशन
हॉट स्पॉटमध्ये डिलिव्हरी नाही
सध्या दारूच्या होम डिलिव्हरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळाल्यानंतर पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल. हॉट स्पॉटमधील दारुची दुकाने उघडणार नसून तेथे होम डिलिव्हरीसुद्धा करणे शक्य होणार नाही.’
-राजू जायस्वाल, अध्यक्ष नागपूर परमिट रूम असोसिएशन
..............