नागपुरात लॉकडाऊनमध्ये वाढली दारू तस्करी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 09:21 PM2020-04-20T21:21:28+5:302020-04-20T21:22:57+5:30
लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे. व्यापारी बनावट दारू दुप्पट, तिप्पट किमतीत विकत आहेत. या बनावट दारूचे दुष्परिणाम समोर आल्यावर प्रशासन अडचणीत सापडणार आहे.
शहर पोलीस लॉकडाऊनच्या बंदोबस्तात आहेत. अशात उत्पादन शुल्क विभागाची भूमिका महत्वाची आहे. विभागाचे अधिकारी झोपडपट्टी अथवा दुचाकी वाहनातून होणाऱ्या दारूच्या तस्करीवर कारवाई करीत आहेत. मोठ्या दारू व्यावसायिकांपर्यंत त्यांचे हात पोहचत नाहीत. दारूच्या अवैध तस्करीला मोठे व्यापारी प्रोत्साहन देत आहेत. दोन महिन्यापूर्वी कळमना पोलिसांनी नकली दारूचा कारखाना चालविणाºयाला उत्तर नागपुरातील एका व्यापाºयाला पकडले होते. त्याची जिल्ह्यात २५ दुकाने आहेत. अशीच अवस्था गल्ली मोहल्ल्यात सत्कार करीत फिरत असलेल्या शहर पोलिसातील काही अधिकाऱ्यांची आहे. सुरुवातीला त्यांनी छोट्यामोठ्या कारवाई करून वाहवा लुटली. झोपडपट्टीतील सट्टा, जुगार अड्डा पकडून अधिकारी शांत झाले. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हणाले की, यासंदर्भात अधीक्षक अधिकृत माहिती देऊ शकतील. विभागाचे अधीक्षक अभिषेक सोनोने यांच्याशी सातत्याने संपर्क केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सांगण्यात येत आहे की, पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईची चर्चा मुंबईत होत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी चिंतेत आहेत.
स्टॉक संपलाय..लागू द्या शेपाचशे
३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. दारूची दुकाने १८ मार्चपासून बंद आहेत. दारू पिणाऱ्यांचा स्टॉकसुद्धा संपला आहे. सुरुवातीला लोकांनी दुप्पट किमतीला दारूची खरेदी केली. ‘लागू द्या..शे पाचशे’ म्हणून कितीही पैशात घ्यायला अनेकजण तयार आहेत. त्यामुळेच सध्या दारूची किंमत तीन ते चार पटीने वाढली आहे. दारूविक्रेत्यांकडून लॉकडाऊन पुन्हा वाढेल, दारूची दुकाने सुरू व्हायला वेळ लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिणारेही मागेल तेवढे पैसे देत आहेत. अशा परिस्थितीत बनावट दारूची विक्रीही वाढली आहे. व्यापारी मध्यप्रदेशातील स्वस्त दारू ब्रॅण्डेड बॉटलमध्ये भरून विकत आहेत. तर काहींनी नकली दारू बनविण्याचे युनिट सुरू केले आहे. ही दारू जास्त प्रमाणात सेवन केल्याने जीवघेणी ठरू शकते.