रस्त्यावर मद्याचे घोट, झुरके, आलिंगन अन् चुंबनही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 10:48 AM2019-12-10T10:48:49+5:302019-12-10T10:49:25+5:30
गुन्हे घडू नयेत, महिला-मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून पोलिसांची धावपळ वाढली आहे. त्यांची रात्रीची गस्त वाढलेली दिसत आहे. दुसरीकडे तरुणाई रस्त्यावरच मद्याचे घोट घेत झुरके घेत आहे.
सुमेध वाघमारे, नरेश डोंगरे, मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडाचे देशभरातील नागरिकांच्या मनावर पडलेले ओरबडे ताजेच आहेत. अशात हैदराबादमध्ये घडलेल्या बलात्कार आणि सामूहिक बलात्काराने या ओरबड्यांवरील खिपल्या पुन्हा काढल्या आहेत. दिशाच्या वेदनांनी देशातील वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. जनमानस, खास करून महिला-मुलींमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. रात्री-बेरात्री घराबाहेर पडलेल्या महिला, मुली किती सुरक्षित आहेत, त्यांनी रात्री रस्त्यावरून जाऊच नये का, असाही प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. दुसरीकडे असे गुन्हे घडू नयेत, महिला-मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून पोलिसांची धावपळ वाढली आहे. त्यांची रात्रीची गस्त वाढलेली दिसत आहे. दुसरीकडे तरुणाई रस्त्यावरच मद्याचे घोट घेत झुरके घेत आहे. इकतेच काय तर आलिंगन अन् चुंबनाच्याही पुढेही प्रकार सुरू आहेत. मध्यरात्रीनंतर नागपुरातील विविध भागातील स्थिती तपासली असता हे धक्कादायक वास्तव पुढे आले. पालकांनी सजग व्हायला हवे, हा एकमेव हेतू हे वास्तव मांडण्याचा ‘लोकमत’चा आहे.
पोलिसांना सहकार्य करावे
नागपुरात रात्रीच्या सुमारास पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असते. अनेकदा पोलीस असे प्रकार करणाऱ्यांना हटकतात. तरुणींना प्रश्नदेखील विचारायला जातात. मात्र बहुतांश वेळा तरुण-तरुणी पोलिसांशी मुजोरीच्या भाषेतच बोलतात. शिवाय काही वेळा तर तरुणींनी खोटे आरोप लावण्याची धमकीदेखील दिली असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा स्थितीत इतर नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्थानिक नागरिकांची थेट तक्रार असेल तर पोलीस सहजपणे कारवाई करु शकतात. शिवाय तरुण-तरुणी सर्वांसमोर अरेरावीची भाषादेखील करु शकणार नाहीत.
काळजी कोण घेणार ?
दुसऱ्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही. स्वत:च स्वत:ची काळजी घेतली तर अनेक धोके टाळता येतात. मात्र, विविध भागात झिंगाट झालेल्या सैराट तरुणींना स्वत:ची काळजी नसल्याचे दिसून येते. सोबतच शहरातील विविध भागात पोलिसांची वाहने (पेट्रोलिंग जीप)ही बघायला मिळतात. बाहेरगावाहून आलेल्या, कार्यक्रमातून पत्नीला, नातेवाईक महिला-मुलीला दुचाकीवर नेणाºया सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलिसांचे वाहन रस्त्यावर दिसणे कमालीचे दिलासादायक ठरते.
बिग बाजारची मागची गल्ली, रामदासपेठ
रामदासपेठ परिसरातील एका प्रतिष्ठित ठिकाणाहून ती दोन मित्र आणि एका मैत्रिणीसोबत खाली उतरली. तिचे वय १७ ते १८ वर्षाच्या दरम्यान असेल. तिने दारू इतकी ढोसली होती की तिला धड उभे राहणेही जमत नव्हते. मित्र आणि मैत्रिणीने तिला हात धरून कसेबसे खाली आणले. खाली कार पार्क केलेली होती. कारमध्ये तिला बसवण्याचा प्रयत्न केला. पण ती बसू शकत नव्हती. तिला उलट्या व्हायला लागल्या. रस्त्याच्या कडेला मित्र मैत्रिणीला पकडून तिने उलट्या केल्या. उलट्यांमुळे ती अस्वस्थ झाली. मित्रांनी कार रस्त्याच्या मधोमध उभी केली. ती ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बेशुद्ध पडल्यासारखी पडून राहिली. सर्वांचे तिला होशमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते. हा प्रकार अर्धा तास सुरू होता. नंतर ते तिला घेऊन गेले.. कुठे ते माहीत नाही.