नागपूर व अजनी रेल्वेस्थानकावर ‘अलर्ट’ जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:52 PM2018-06-30T12:52:37+5:302018-06-30T12:54:24+5:30
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागपूर, अजनी स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून दिल्लीकडून येणाऱ्या आणि इतर संवेदनशील रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना अल कायदाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दिल्ली मुख्यालयाकडून सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित मुख्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना अलर्टमध्ये देण्यात आल्या आहेत. नागपूर आणि अजनी स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १५० च्या वर प्रवासी गाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्या ४० ते ४५ हजारावर आहे. रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करण्यासाठी अनेक खुष्कीचे मार्ग असून सुरक्षा भिंतही नाही. यात बॅग स्कॅनरही दीड महिन्यापासून बंद असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. या सर्व बाबींकडे पाहून आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतिजा यांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. राजधानी एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात येत असून श्वान पथकाद्वारे प्लॅटफॉर्मवर नजर ठेवण्यात येत आहे.
सुरक्षेत वाढ
‘रेल्वे सुरक्षा दल नेहमीच सतर्क राहते. परंतु मुख्यालयाकडून पत्र मिळाल्यामुळे रेल्वेस्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर-अजनी स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संवेदनशील तसेच दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय श्वानपथकाद्वारे रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे.’
-ज्योती कुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,
आरपीएफ, नागपूर