‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून १० मिनिटांअगोदर मिळू शकणार वीज कोसळण्याचा ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 09:00 AM2023-01-05T09:00:00+5:302023-01-05T09:00:00+5:30
Nagpur News लवकरच ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून संबंधित भूभागात १० मिनिटांअगोदर वीज पडण्याची नेमकी वेळ कळू शकणार आहे. यादृष्टीने ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू असून ‘जिओस्टेशनरी मॅपर’वर काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो जीव वाचू शकणार आहेत.
योगेश पांडे
नागपूर : विदर्भासह देशात पावसाळ्यात वीज पडून जीव जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानातून तीन ते सहा तास अगोदरपर्यंत वीज पडण्याचा इशारा देणे शक्य आहे. मात्र, लवकरच ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून संबंधित भूभागात १० मिनिटांअगोदर वीज पडण्याची नेमकी वेळ कळू शकणार आहे. यादृष्टीने ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू असून ‘जिओस्टेशनरी मॅपर’वर काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो जीव वाचू शकणार आहेत.
१०८ व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’च्या निमित्ताने नागपुरात आलेले ‘इस्रो’चे वैज्ञानिक सचिव शंतनु भाटवडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना असे प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. वीज पडणे ही तशी गुंतागुंतीची वातावरणीय प्रक्रिया मानण्यात येते. भारतातील वीज पडण्याच्या घटना लक्षात घेता ‘इस्रो’ व ‘नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर’तर्फे देशात २५ ठिकाणी ‘लाइटनिंग डिटेक्शन सेन्सर्स’चे नेटवर्क स्थापन करण्यात आले आहे. आगमनाच्या वेळेचा ‘अल्गोरिदम’ वापरून वीज पडण्याचा अंदाज लावण्यात येतो. ‘क्लाऊट टू ग्राऊंड’चा हा अंदाज काही तासांअगोदर लावता येणे शक्य असते. मात्र, त्यात १०० किलोमीटरच्या भागाचा अंदाज लावण्यात येतो व नेमकी जागा वेळेत कळत नाही. ‘आयआयटीएम’ने देशात ८३ ठिकाणी यासंदर्भात यंत्रणा लावली आहे. त्या माध्यमातून २० ते ४० किमी अंतरात कुठे वीज पडू शकते, याची सूचना मिळू शकते. मात्र, बहुतांश वेळा नेमकी वेळ समोर येत नाही.
हीच बाब लक्षात घेता केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेदेखील ‘इस्रो’तील वैज्ञानिकांशी चर्चा केली होती. काही विकसित देशात ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून वीज पडण्याचा ‘अलर्ट’ मिळतो. त्याच धर्तीवर भारतीय बनावटीची यंत्रणा विकसित करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येत आहेत. यात ‘जिओस्टेशनरी मॅपर’चा प्रकल्प राहणार आहे. तसेच ‘जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स’वर वीज पडण्याची सूचना देणारे ‘डिटेक्टर’ व यंत्रणा ‘इन्टॉल’ करावी लागणार आहे. या माध्यमातून ढगांमधील विद्युत हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर राहणार आहे.
छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्रातच सर्वाधिक विजेचे तांडव
भारतीय हवामान विभागाने यापूर्वी ‘दामिनी’ नावाचे ॲप विकसित केले होते. विजेच्या घडामोडींवर जीपीएस व डाटाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते व तीन ते चार तास अगोदर वीज पडण्याबाबत सूचना देण्यात येते. मात्र, तरीदेखील विजेमुळे नुकसान सुरूच आहे. महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये अलीकडच्या वर्षांत अधिक वीज पडण्याच्या घटना घडल्या.
२०२२ मध्ये ९०७ मृत्यू
वीज पडल्यामुळे २०२२ या एकाच वर्षात ९०७ मृत्यू झाले. मागील १४ वर्षांतील हा सर्वांत मोठा आकडा आहे. विविध शासकीय यंत्रणांद्वारे वीज पडण्याची आगाऊ सूचना देण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात ही सूचना काही तासांअगोदर मिळते व निश्चित स्थानदेखील कळत नाही. ‘सॅटेलाइट’च्या उपयोगामुळे ‘क्लाऊट टू क्लाऊड’ डाटा मिळून वीज पडण्याची नेमकी वेळ कळविणे शक्य होणार आहे.