मुष्टियाेद्धा स्पर्धेत अल्फियाला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:55+5:302021-03-04T04:14:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : बाेखारा येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी अल्फिया अक्रम खान पठाण हिने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : बाेखारा येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी अल्फिया अक्रम खान पठाण हिने आंतरराष्ट्रीय मुष्टियाेद्धा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत नागपूरच्या इतिहासात मानाचा तुरा राेवला आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आंतरराष्ट्रीय मुष्टियाेद्धा स्पर्धेत माेन्टेनेगराे येथे सुवर्णपदक पटकविण्याचा बहुमान तिने प्राप्त केला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा मोंन्टेनेगरो येथील बुडवा येथे ३० व्या ॲड्रीऐटीक पल बॉक्सिंग स्पर्धेत १८ वर्षीय अल्फियाने ८१ किलो वजनगटात ही बहुमूल्य कामगिरी बजावली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये आयाेजित ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये ८० किलाेपेक्षा वरील गटात सुवर्णपदक जिंकून तिने आपले स्थान कायम ठेवले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील उत्तम खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी डारिया कोझरेव्ह हिचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. जिद्दीने खेळाची सुरुवात करीत लढतीत वर्चस्व स्थापित केले व आक्रमक खेळीने प्रतिस्पर्धीला हरवले. या खेळामुळे लहानपणापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करण्याचे स्वप्न तिचे पूर्ण झाले आहे.
अल्फिया पठाण हिच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा संस्थेच्या संचालिका लता वाघ यांनी तिचे कौतुक केले. संस्थेचे सचिव डॉ. मारुती वाघ, सदस्य प्रा. वसंत हिवरकर यांनीही अल्फियाला तिच्या पुढील खेळाकरिता शुभेच्छा दिल्या.