नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईत; कार्यकर्त्यांच्या नजरा सभागृहाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 09:01 PM2022-06-29T21:01:08+5:302022-06-29T21:01:42+5:30
Nagpur News भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले.
नागपूर : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. बहुमत चाचणीच्या वेळी - ऐनवेळी कुठलीही अडचण नको, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले. राज्यात सत्ताबदल होणार की नियम व आकड्यांचे गणित आणखी काही ‘ट्विस्ट’ आणणार याकडे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात तापलेले राजकीय वातावरण असताना भाजपने मंगळवारी दक्षिण-पश्चिम नागपुरातील एका हॉटेलमध्ये माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीदरम्यान पूर्व विदर्भातील सर्व आमदारांना देखील बोलविण्यात आले होते. या बैठकीच्या अगोदर सर्व आमदारांना मुनगंटीवार यांनी पक्षाचा निरोप दिला व तातडीने मुंबईला पोहोचण्याच्या सूचना दिल्या. बैठक आटोपल्यावर आमदारांना इतरही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. बुधवारी सकाळी जिल्ह्यातील सर्वच आमदार मुंबईकडे रवाना झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोशल मीडियावर ‘दक्ष’
बहुमत चाचणीनंतर जर महाविकास आघाडी सरकार पडले तर भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. विशेषत: सोशल मीडियावरून सातत्याने ‘अपडेट्स’ घेण्यात येत आहेत.
आमदारांचे ‘नो कमेंट्स’
यासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्ह्यातील तीन ते चार आमदारांशी संपर्क साधला. मात्र, पक्षाची भूमिका काय असेल याबाबत बोलण्यास कुणीही तयार नव्हते. पक्षाकडून जे निर्देश व सूचना येतील, त्याचे आम्ही तंतोतंत पालन करू, असे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.