निर्बंधामुळे शहरातील सर्व व्यवसाय संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:27+5:302021-07-11T04:07:27+5:30
नागपूर : कोरोना महामारीत मार्च २०२० पासून नागपूर जिल्ह्यातील व्यवसाय मंदीत आणि व्यापारी संकटात असून शासनाने व्यापाऱ्यांना सवलतींचे ऑक्सिजन ...
नागपूर : कोरोना महामारीत मार्च २०२० पासून नागपूर जिल्ह्यातील व्यवसाय मंदीत आणि व्यापारी संकटात असून शासनाने व्यापाऱ्यांना सवलतींचे ऑक्सिजन न दिल्यास स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीचा गेल्यावर्षी मार्चमध्ये नागपूर जिल्ह्यात प्रवेश होताच व्यापाऱ्यांना संकटाचे दिवस पाहावे लागत आहेत. पूर्वी अडीच महिने लॉकडाऊन आणि नंतर अनलॉक प्रक्रियेत विविध क्षेत्र निर्बंधात राहिले. ऑक्टोबरनंतर काहीसा दिलासा मिळाला आणि दिवाळी सणात व्यवसाय रुळावर आल्याने व्यापारी आनंदी झाले. त्यानंतर व्यवसायाने जोर पकडला. व्यवसाय वाढीचा वेग नवीन वर्षात फेब्रुवारीपर्यंत चांगला होता. पण त्यानंतर संक्रमणाने हळूहळू वेग पकडला आणि एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनामुळे शहरात हाहाकार माजला. अशा स्थितीत दुकाने ताळेबंद करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊन हटविण्यात आले, पण वेळेचे निर्बंध लावण्यात आले. स्थितीची समीक्षा करून नागपुरात संक्रमणाचा दर कमी झाला आणि रिकव्हरी दर वाढल्याने राज्य शासनाने लेव्हल-१ अंतर्गत सवलती दिल्या आणि दुकाने केवळ पाच दिवस रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली.
त्यानंतर शासनाने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नावावर नागपूरला लेव्हल-१ मधून लेव्हल-३ मध्ये टाकले आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात नागपुरात १५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी दिली.
मेहाडिया म्हणाले, जिल्ह्यातील व्यापारी लॉकडाऊनने त्रस्त झाले असून निर्बंधामुळे व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. वेळेवर सवलतींचे ऑक्सिजन न मिळाल्यास स्थिती हाताबाहेर जाईल आणि व्यापाऱ्यांवर उपाशी मरण्याची पाळी येईल. तिसरी लाट येईल, तेव्हा प्रशासनाने निश्चितच लॉकडाऊन लावावे, पण सध्या स्थिती आटोक्यात असल्याने दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी आणि व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव तरुण निर्बाण म्हणाले, शेतकरी आत्महत्येसारखी स्थिती व्यापाऱ्यांवर येऊ नये. नागपूर जिल्ह्याची सुस्थिती पाहता दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. सध्या व्यापारी संकटात असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
प्रॉपर्टी विकण्यास बाध्य
ट्रान्सपोर्ट, कॅटरिंग, सलून व्यवसायासह सर्वच व्यावसायिक क्षेत्रावर कोरोनामुळे संकट आले आहे. निरंतर लॉकडाऊन आणि वेळेच्या निर्बंधामुळे अनेक व्यापाऱ्यांना घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. अनेकांनी दुकाने नेहमीसाठीच बंद केली आहे तर कुणी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी प्रॉपर्टी व दागिने विकले आहेत. अशा व्यापाऱ्यांना मदत करण्याची मागणी अश्विन मेहाडिया आणि तरुण निर्बाण यांनी केली आहे.