नागपुरातील सर्व बालगृहांची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:25 AM2018-08-29T11:25:09+5:302018-08-29T11:26:35+5:30

बिहारमधील बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र शासनाला अखेर जाग आली आहे. केंद्राच्या निर्देशावरुन नागपुरातील बालगृहांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.

All the child home in Nagpur will be inspected | नागपुरातील सर्व बालगृहांची तपासणी होणार

नागपुरातील सर्व बालगृहांची तपासणी होणार

Next
ठळक मुद्देकेंद्राचे निर्देश बिहारमधील अत्याचाराच्या घटनांनंतर उचलले पाऊल

मेघा तिवारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहारमधील बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र शासनाला अखेर जाग आली आहे. केंद्राच्या निर्देशावरुन नागपुरातील बालगृहांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष समिती नेमण्यात आली असून सप्टेंबरपर्यंत तपासणीचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बिहारमध्ये बालगृहातील ७ ते १८ वयोगटातील ३४ मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता, असा अहवाल ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस’तर्फे देण्यात आला. लैंगिक अत्याचाराच्या या घटनांची केंद्राने गंभीर दखल घेतली व प्रत्येक बालगृहाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले. नागपुरात सद्यस्थितीला १२ बालगृहे आहेत व यात मुलेमुली मिळून एकूण ४०० जण राहतात. नागपुरात बिहारसारखी घटना घडू नये यासाठी बालगृहांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष पथकाद्वारे ही तपासणी होईल, अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजय सिंह परदेशी यांनी दिली. तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहे. नागपुरात आम्ही प्रत्येक महिन्यात बालगृहांची तपासणी करतोच. आतापर्यंत आम्हाला काहीही गैरप्रकार आढळून आला नाही. सोबतच आम्ही ‘पोक्सो’सारख्या कायद्यांची माहितीदेखील बालगृहातील मुलामुलींना देतो. आता सर्वंकष तपासणी होईल, असे त्यांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञांचा राहणार समावेश
बालगृहांची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या पथकात सात जणांचा समावेश असेल. यात बालकल्याण समिती, बालन्याय मंडळ, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. सोबतच एका मानसोपचारतज्ज्ञाचादेखील समावेश असेल. हे पथक मुलामुलींशी संवाद साधेल व त्यांच्या मानसिकतेचा अंदाजदेखील घेण्यात येईल, अशी माहिती परदेशी यांनी दिली.

Web Title: All the child home in Nagpur will be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार