रेल्वेआरक्षण कार्यालयात दिवसभर शुकशुकाट : केवळ १३० तिकिटांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:29 PM2020-05-22T23:29:17+5:302020-05-22T23:32:44+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचेआरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १ जूनपासून सुरु होणाऱ्या १०० जोडी रेल्वेगाड्यांची तिकिटे आज आरक्षण खिडक्यांवरून देण्यात आली. परंतु खूप कमी प्रवासी आरक्षणासाठी आले तर बहुतांश नागरिक आपले तिकीट रद्द करण्यासाठी आले होते.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वे स्थानकावर दोन आरक्षण खिडक्या सुरु करण्यात आल्या होत्या. या खिडक्यांवरून केवळ ४२ तिकिटांची विक्री झाली. यामुळे रेल्वेला केवळ ४२ हजार ८५० रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजनीच्या आरक्षण कार्यालयातून केवळ १० तिकीट विकल्या गेले. यातून १० हजार ८९० रुपये मिळाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकावरून ७८ तिकीट विकल्या गेले. यातून विभागाला ४९ हजार ५२० रुपयांचे उत्पन्न मिळाले. सोबतच ४७ हजार ८६० रुपयांचा परतावा जुन्या तिकिटांवर प्रवाशांना देण्यात आला. याशिवाय राजनांदगाव स्थानकाच्या आरक्षण कार्यालयातून १२ तिकिटांच्या विक्रीतून ४९२० रुपये मिळाले. तर २ तिकिटे रद्द केल्यामुळे ३३३५ रुपये प्रवाशांना परत करावे लागले. डोंगरगडमध्ये ३ तिकिटे विकल्याने २८९० रुपयांचे उत्पन्न झाले. तर २ तिकिटे रद्द केल्यामुळे २३६० रुपये परत करावे लागले. भंडारा रोड स्थानकावरून ४ तिकिटांच्या विक्रीतून २ हजार रुपये उत्पन्न झाल्याची नोंद करण्यात आली आहे.