दिवसभर एस.टी. चालवायची अन् रात्रीही त्यातच कुडकुडत झोपायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 07:45 AM2022-11-25T07:45:00+5:302022-11-25T07:45:01+5:30

Nagpur News सकाळी शहरातील शाळा-महाविद्यालयात शिकायला येणारे विद्यार्थी तसेच विविध कामाच्या निमित्ताने शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी बसचे चालक-वाहक त्या-त्या गावात मुक्कामी राहतात. त्याला हॉल्टिंग असेही म्हटले जाते.

All day ST. I used to drive it and used to sleep in it at night | दिवसभर एस.टी. चालवायची अन् रात्रीही त्यातच कुडकुडत झोपायचे

दिवसभर एस.टी. चालवायची अन् रात्रीही त्यातच कुडकुडत झोपायचे

Next

नागपूर : शहरापासून दूर अंतरावर राहणाऱ्या गावांतील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भल्या सकाळी गावातून शहरात येण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून एस.टी. महामंडळाची बस त्या-त्या गावात रात्रीच पोहोचते. मात्र, अनेक ठिकाणचे ग्रामपंचायत प्रशासन ही बस घेऊन जाणारे एस.टी.चे चालक, वाहकांच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय करण्याचे साैजन्य दाखवत नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने बसचालक, वाहकांना बसमध्येच रात्र काढावी लागते. सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे या बिचाऱ्यांना रात्रभर कुडकुडत राहावे लागते आणि भल्या सकाळी थंडीतच प्रवाशांना घेऊन शहराकडे निघावे लागते.

ग्रामपंचायतीने व्यवस्था करणे गरजेचे

सकाळी शहरातील शाळा-महाविद्यालयात शिकायला येणारे विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी तसेच विविध कामाच्या निमित्ताने शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी बसचे चालक-वाहक त्या-त्या गावात मुक्कामी राहतात. त्याला हॉल्टिंग असेही म्हटले जाते. अर्थात ही सेवा गावकऱ्यांसाठीच असते. त्यामुळे ज्या गावात बस मुक्कामी आली त्या बसच्या चालक-वाहकाची किमान रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था त्या-त्या गावातील नागरिकांनी अर्थात ग्रामपंचायतीने करायला हवी. मात्र, असे होत नाही. दिवसा त्यांना तासन्तास एस.टी. चालवावी लागते आणि रात्र एस.टी.तच कुडकुडत काढावी लागते.

५८ बसेस जातात इतर गावात मुक्कामाला

नागपुरातील आगारातून जिल्ह्यातील ५८ वेगवेगळ्या गावात बसेस रात्रीच्या मुक्कामाला जातात. बसचालक-वाहक त्या गावात रात्रभर थांबून सकाळी त्या गावातील आणि मार्गातील प्रवाशांना घेऊन नागपुरात पोहोचतात.

एस.टी.तच रात्र काढावे लागते

या संबंधाने खऱ्या अर्थाने चालक आणि वाहकांना त्रास सहन करावा लागतो. तेच या प्रकारातील पीडित ठरतात. सोबत अंथरून पांघरूण घेऊन त्यांना जावे लागते. दोघांपैकी एक पुढच्या सीटवर तर दुसरा मागच्या सीटवर झोप काढतो.

डास आणि थंडीमुळे झोप कशी लागेल?

एस.टी. बसची सीट लांबलचक असली तरी ती अरुंद असते. त्यामुळे मुळात बसचालक, वाहकच काय कुणीच तेथे व्यवस्थित झोपू शकत नाही. त्यात दिवसभरात ठिकठिकाणांहून चपला जोड्यांना लागलेली घाण घेऊन प्रवासी बसमध्ये चढत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसमध्ये डासांचे साम्राज्य असते. त्यावर थंडीचा जोर, अशात आम्हाला कशी झोप लागत असेल, त्याची तुम्हीच कल्पना करा, असे बसचालक-वाहक आपली व्यथा मांडताना म्हणतात.

 

काही ठिकाणी चांगली व्यवस्था होते. ज्या ठिकाणी व्यवस्था नसते त्या ठिकाणी बसस्थानकावर आम्ही व्यवस्था करतो. त्यामुळे फारसा प्रॉब्लेम नाही.

श्रीकांत गभणे

विभागीय नियंत्रक, एस.टी., नागपूर.

Web Title: All day ST. I used to drive it and used to sleep in it at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.