संमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी तिन्ही ‘डॉक्टर’ सज्ज!
By admin | Published: September 23, 2016 03:10 AM2016-09-23T03:10:41+5:302016-09-23T03:10:41+5:30
डोंबिवलीला होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.
मतदार यादीची प्रतीक्षा : सोशल मीडियावर मोर्चेबांधणी सुरू
शफी पठाण नागपूर
डोंबिवलीला होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. या निवडणुकीसाठी नागपुरातील साहित्याचे तीन चिकित्सक अर्थात डॉक्टर सज्ज झाले असून यातले एक डॉ. मदन कुळकर्णी यांनी तर व्हॉटस् अॅपवरून आपली उमेदवारी जाहीरही केली आहे. दुसरे दोन डॉक्टर म्हणजे डॉ. अक्षयकुमार काळे व डॉ. रवींद्र शोभणे यांनीही त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. मतदार याद्यांची प्रतीक्षा आहे. त्या हाती आल्या की अर्ज दाखल करण्यासोबतच मतदारांच्या भेटीगाठीचा ‘सिलसिला’ वाढणार आहे.
संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वांतआधी ज्येष्ठ समीक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. मदन कुळकणी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या स्वहस्ताक्षरातील आवाहनाची एक फोटो कॉपी आपल्या सहकाऱ्यांना व्हॉटस् अॅपवरून पाठवून दिली. डॉ. अक्षयकुमार काळे व डॉ. रवींद्र शोभणे यांनी अजून सार्वजनिकरित्या निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली नसली तरी त्यादिशेने तयारी सुरू केली आहे. डॉ. मदन कुळकणी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ते ही निवडणूक लढणारच असा निर्धारही व्यक्त केला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनीही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. ‘गालिब’च्या निमित्ताने त्यांची अखिल महाराष्ट्र व गुलबर्ग, इंदोर, वडोदा, धारवाड अशी एक अनौपचारिक फेरी पूर्णही झाली आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांची इच्छा असूनही याआधी त्यांनी दोनदा माघार घेतली होती. आता त्यांची मित्र परिवारात चर्चा सुरू असून यावेळी उमेदवारी जाहीर केली तर कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढायचीच, या निर्णयाप्रत ते पोहोचले आहेत.