सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’त जावे : कुलगुरु काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:45 PM2018-11-01T22:45:43+5:302018-11-01T22:48:46+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ दोन महाविद्यालये ही ‘बाटू’शी (बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) संलग्नित आहेत. मात्र विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांनी ‘बाटू’मध्ये जावे व तीच काळाची गरज आहे, असे वक्तव्य नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे.

All engineering colleges should go to BATU: Voice Chancellor Kane | सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’त जावे : कुलगुरु काणे

सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’त जावे : कुलगुरु काणे

googlenewsNext
ठळक मुद्दे विद्यापीठ महसूलवाढीसाठी चालत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ दोन महाविद्यालये ही ‘बाटू’शी (बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) संलग्नित आहेत. मात्र विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांनी ‘बाटू’मध्ये जावे व तीच काळाची गरज आहे, असे वक्तव्य नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी राज्य शासनाने ‘बाटू’ची निर्मिती केली होती. मात्र राज्यातील फारच कमी महाविद्यालये त्या विद्यापीठाशी संलग्नित झाली. प्रत्यक्षात महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठात राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये समाविष्ट झाली. त्याप्रमाणे ‘बाटू’लादेखील प्रतिसाद मिळायला हवा होता. नागपूर विद्यापीठातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी तेथे जायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जर महाविद्यालये तेथे संलग्नित होत नसतील तर मुळात ‘बाटू’ची निर्मितीच का झाली, असा प्रश्न डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी उपस्थित केला. ‘बाटू’मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांनी समाविष्ट होणे अनिवार्य केले पाहिजे. यामुळे नागपूरसारख्या मोठ्या विद्यापीठांवरील भार कमी होईल. काही प्रमाणात महसूल नक्कीच कमी होईल. मात्र विद्यापीठे ही महसूलवाढीसाठी कार्य करत नाहीत, असेदेखील ते म्हणाले.

महाविद्यालयांना विद्यापीठाचे ‘ब्रॅन्डनेम’ महत्त्वाचे
पर्याय उपलब्ध असतानादेखील अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’कडे वळली नाहीत. याची कारणे शोधण्याची गरज आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाचे ‘ब्रॅन्डनेम’ जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच ते ‘बाटू’कडे जाणार नाहीत. ‘बाटू’लादेखील हा पसारा कितपत पेलता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विद्यापीठांचे ओझे कमी होईल
मोठ्या विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या कामाचा ताण जास्त असतो. तेथील विद्यार्थीसंख्यादेखील जास्त असते. अशा स्थितीत जर ही महाविद्यालये ‘बाटू’मध्ये गेली तर विद्यापीठांचे ओेझे कमी होईल. विद्यापीठांमध्ये पारंपरिकशिवाय कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांवर जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देता येईल, असे डॉ.काणे यांनी सांगितले.

राजकारण व व्यापाराने शिक्षणक्षेत्र नासवले
शिक्षणक्षेत्रात गेल्या काही काळापासून राजकारण व व्यापारी मनोवृत्तीचा प्रभाव जास्त जाणवत आहे. या दोन्ही गोष्टींनी शिक्षणक्षेत्र अक्षरश: नासवले आहे. या गोष्टी दूर केल्या तरच शिक्षणक्षेत्राचा सर्वार्थाने व विद्यार्थीहिताच्या दिशेने विकास होऊ शकेल, असा दावा डॉ.काणे यांनी केला.

Web Title: All engineering colleges should go to BATU: Voice Chancellor Kane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.