बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:41+5:302021-07-08T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ने बुधवारी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. तेव्हा त्यांनी यासंदर्भात मनमोकळी चर्चा केली. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले, बाबासाहेबांचे विचारधन हे देशाला दिशा देणारे आहे. त्यामुळे त्यांचे जास्तीतजास्त विचारधन हे पुस्तक रूपाने लोकांपर्यंत यावे, यासाठी चरित्र साधने समिती कार्यरत आहे. मी नुकताच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. एकूणच चार टप्प्यांवर काम करण्यावर आम्हाला काम करावे लागणार आहे. त्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. सर्वांत प्रथम म्हणजे बाबासाहेबांच्या सर्व प्रकाशित इंग्रजी खंडांचे मराठी भाषेत अनुवाद करून ते नव्याने प्रकाशित करायचे. यासोबतच आजवरच्या सर्व अनुवादित साहित्याचे पुनर्मुद्रण करणे, तसेच बाबासाहेबांचे नवनवीन साहित्य शोधणे व त्याचे प्रकाशन करणे होय. याशिवाय सोर्स मटेरियल अंतर्गत ‘जनता’ या पाक्षिकाचे खंड प्रकाशित करण्यात येतील. चार टप्प्यांतील ही कामे वाटतात तितकी सोपी नाहीत; परंतु योग्य नियोजन करून ही सर्व कामे समिती पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- ‘रुट्स ऑफ रिव्होलेशन’ लवकरच प्रकाशित होणार
सोर्स मटेरियल अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रुट्स ऑफ रिव्होलेशन’ हा खंड लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. तब्बल ७०० पानांचा हा खंड असून, त्याचे जवळपास सर्व काम झाले आहे. येत्या काही दिवसांत हा खंड लोकांपर्यंत उपलब्ध होईल.
- मुंबईलाच राहून काम करणार
बाबासाहेबांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे काम खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी पूर्णवेळ मुंबईला राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मुंबईलाच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस नागपूरला येत-जात राहू; परंतु मुंबईलाच राहून समितीचे पूर्ण काम करण्यात येईल.
डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती