२०२७ पर्यंत ‘बेस्ट’मध्ये सर्व ताफा, ‘ई-बस’चा ३,२०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

By योगेश पांडे | Published: December 13, 2023 05:02 PM2023-12-13T17:02:28+5:302023-12-13T17:02:49+5:30

सुनिल शिंदे, विलास पोतनीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बेस्टच्या बसेसचा मुद्दा उपस्थित केला होता.

All fleet in 'BEST' by 2027, Tender process for 3,200 buses of 'E-bus' completed | २०२७ पर्यंत ‘बेस्ट’मध्ये सर्व ताफा, ‘ई-बस’चा ३,२०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

२०२७ पर्यंत ‘बेस्ट’मध्ये सर्व ताफा, ‘ई-बस’चा ३,२०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

नागपूर : मुंबईची ‘सेकंड लाईफलाईन’ मानण्यात येणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात २०२७ पर्यंत सर्व गाड्या ‘ई-बस’ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पावलेदेखील उचलण्यात येत असून लवकरच ३ हजार २०० बस समाविष्ट होतील, अशी माहिती राज्य शासनातर्फे बुधवारी विधानपरिषदेत देण्यात आली.

सुनिल शिंदे, विलास पोतनीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बेस्टच्या बसेसचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर राज्य शासनातर्फे उदय सामंत यांनी ही माहिती दिली. २०१८-१९ मध्ये बेस्टची प्रवासीसंख्या दरदिवशी २२ लाख इतकी होती. आता ही संख्या ३३ लाखांवर गेली आहे. सद्यस्थितीत बेस्टकडे ३५ डबल डेकर व ४५ सिंगल डेकर ई-बसेस आहेत. बेस्टतर्फे २ हजार १०० एकमजली, ९०० डबल डेकर व २०० सीएनजी अशा ३ हजार २०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जास्त ई-बसेससाठी केंद्राकडेदेखील पाठपुरावा करण्यात येईल. बेस्ट वर्कर्स युनियन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातील करारानुसार बेस्टचा स्वमालकीचा बसताफा हा ३ हजार ३३७ इतका कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बेस्टने महानगरपालिकेकडे निधीची मागणी केली आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान महानगरपालिकेकडून बेस्टला ५ हजार ६७८ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती सामंत यांनी केली.

भाड्याच्या बस वाढविण्यावर भर
बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या बसेसचा खर्च दर किलोमीटरला १९३.६४ रुपये इतका आहे. तर भाडेतत्वावरील बसेसचा खर्च दर किलोमीटरला १२० रुपये असा आहे. त्यामुळेच भाड्याच्या बसेसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: All fleet in 'BEST' by 2027, Tender process for 3,200 buses of 'E-bus' completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.