चारही ऐतिहासिक तोफा मध्यवर्ती संग्रहालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:59 PM2019-10-18T22:59:20+5:302019-10-18T23:00:29+5:30
सैन्यदलाने गुरुवारी पार्कवरील तोफांचा ताबा आपल्याकडे घेतला होता, मात्र त्या ऐतिहासिक तोफा पुरातत्त्व विभागाकडे सोपविल्या. त्या चारही तोफा आता मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्तूरचंद पार्कवर सौंदर्यीकरणाच्या खोदकामादरम्यान चार पुरातन तोफा मिळाल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पुरातत्त्व विभाग, जिल्हा कार्यालय आणि सैन्यदलाची धावपळ चालली होती. सैन्यदलाने गुरुवारी पार्कवरील या तोफांचा ताबा आपल्याकडे घेतला होता, मात्र गुरुवारी त्या ऐतिहासिक तोफा पुरातत्त्व विभागाकडे सोपविल्या. त्या चारही तोफा आता मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, यानंतर कस्तूरचंद पार्कवर सुरू असलेले सौंदर्यीकरणाचे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली चालणार असून, खोदकामादरम्यान निघणाऱ्या एका एका वस्तूची पाहणी करण्यासाठी विभागाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.
विशेष म्हणजे कस्तूरचंद पार्कवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू असताना केलेल्या खोदकामादरम्यान बुधवारी रात्री चार पुरातन तोफा सापडल्याने ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे पुरातत्त्व विभागाचीही धावपळ वाढली होती. या तोफा सैन्याने गुरुवारी आपल्या ताब्यात घेतल्या. मात्र या तोफांची ऐतिहासिकता तपासण्यासाठी पुरातत्त्व विभागाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे या चारही तोफांचा ताबा मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली. त्यामुळे सेनेने या तोफा आज पुरातत्त्व विभागाकडे सोपविल्या. यावेळी जिल्हा प्रशासन, पुरातत्त्च विभाग व सैन्य अधिकारी उपस्थित होते. पुरातत्त्व विभागाच्या संचालिका जया वाहणे यांनी, या चारही तोफा सुरक्षित असून त्यांना कुठलेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली व त्या तोफा मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आल्या. पुढे या तोफांना स्वच्छ करण्यात येईल आणि विशेष लेप लावून सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे वाहणे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सविस्तर संशोधन करण्यात येईल.
मुंबई संचालनालयाच्या परवानगीनंतरच खोदकाम
दरम्यान, चार तोफा मिळाल्यानंतर कस्तूरचंद पार्कवर आणखी शस्त्रसाठा आणि इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे सौंदर्यीकरणाचे काम थांबवून खोदकाम सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सध्या तरी याबाबत निश्चित नसल्याचे जया वाहणे यांनी सांगितले. याबाबत विभागाच्या मुंबई येथील संचालनालयाला माहिती देण्यात आली आहे. सविस्तर अध्ययनानंतर जिल्हाधिकारी आणि मुंबईहून परवानगी आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तोफा इंग्रजांच्याच
जया वाहणे यांनी सांगितले, प्राथमिक चौकशीदरम्यान या चारही तोफा इंग्रजांच्या असल्याची शक्यता व्यक्त केली. दोन तोफांना हुक आहे तर दोघींवर नाही आणि त्यावर ब्रिटिशांची मुद्रा उमटविल्याचे दिसून येत आहे. यासारख्याच काही तोफा सीताबर्डी किल्ल्यावर ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तोफा सापडल्यानंतर त्या इंग्रजांच्या आहेत की भोसल्यांच्या, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. कारण भोसल्यांकडेही तोफखाना होता, मात्र त्यात अशा लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफा नव्हत्या. मात्र त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून तोफा घेतल्याचा दावा करण्यात येत होता. १८१७ च्या सीताबर्डी युद्धात या तोफा निर्णायक ठरल्या होत्या व या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला होता. त्यामुळे या तोफा इंग्रजांच्याच सैन्यातील असल्याची दाट शक्यता विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.