संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 01:00 PM2020-03-02T13:00:55+5:302020-03-02T13:02:26+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १५ ते १७ मार्चदरम्यान कर्नाटकमधील बंगळुरू येथे करण्यात आले आहे.

The All-India House of Representatives of RSS is from March 15 | संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून

Next
ठळक मुद्दे‘एनआरसी’, लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर संघमंथन?संघ विस्ताराचे नियोजन ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १५ ते १७ मार्चदरम्यान कर्नाटकमधील बंगळुरू येथे करण्यात आले आहे. सलग दुसऱ्यांदा केंद्रात भाजप सरकार आल्यानंतरची ही पहिलीच प्रतिनिधी सभा असणार आहे. संघाच्या अजेंड्यावरील राममंदिर, ‘सीएए’चा मार्ग मोकळा झाला असल्याने आता देशात ‘एनआरसी’ लागू करणे तसेच लोकसंख्या नियंत्रण कायद्यासंदर्भात या सभेत मंथन होऊ शकते. ‘सीएए’ला होणारा विरोध व दिल्लीत झालेला हिंसाचार या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व आले आहे.
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी समिती असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्यअहवाल मांडतात. १५ ते १७ मार्चदरम्यान सभा होणार असली तरी अगोदर संघटनात्मक पातळीवर बैठका होणार आहेत. भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. समान नागरी कायद्याबाबत संघाचा आग्रह, सामाजिक समरसतेची मोहीम, केरळ-काश्मीरबाबतची संघाची दृष्टी, इत्यादी मुद्यांवर या सभेदरम्यान चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरिता मंथन होणार आहे. संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
या सभेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रतिनिधींचा सूर आहे. दरम्यान, सभेअगोदरदेखील विविध स्तरावरील बैठका होणार आहेत. यात केंद्रीय टोळी बैठक, कार्यकारी मंडळ बैठक, प्रांत प्रचारकांची बैठक यांचा प्रामुख्याने समावेश असेल.

महिला प्रतिनिधीदेखील सहभागी होणार
तीन दिवसीय चालणाºया या सभेला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचार, विभाग प्रचारक यांच्यासह १ हजार ४०० प्रतिनिधी उपस्थित राहतील. संघाच्या निर्णयप्रणालीत महिलांना स्थान नसते अशी टीका होते. परंतु सभेमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या प्रतिनिधीदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी दिली.

बंगळुरुतील पाचवी सभा
याअगोदर बंगळुरू येथे प्रतिनिधी सभेच्या चार बैठका झाल्या असून ही पाचवी बैठक ठरेल. तर कर्नाटक राज्यातील सातवी बैठक असेल. या बैठकीत संघाच्या वर्षभरातील उपक्रमांची समीक्षा होईल व पुढील एक वर्षातील योजना निश्चित करण्यात येतील. तसेच संघविस्तारावरदेखील सखोल मंथन होईल. या बैठकीत भाजपाचे संघटनमंत्री व्ही.एल.संतोष व सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हेदेखील उपस्थित राहतील. तर अखेरच्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थित राहतील, अशी माहिती संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

Web Title: The All-India House of Representatives of RSS is from March 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.