ऑल इंडिया रेंजर्स असोसिएशनने पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:01+5:302021-04-01T04:08:01+5:30
नागपूर : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया रेंजर्स असोसिएशनने बुधवारी काळा दिवस पाळला. नागपुरातील सर्व अधिकाऱ्यांनीही ...
नागपूर : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया रेंजर्स असोसिएशनने बुधवारी काळा दिवस पाळला. नागपुरातील सर्व अधिकाऱ्यांनीही काळ्या फिती बांधून काम केले आणि या घटनेचा निषेध व्यक्त केला.
३१ मार्च हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन ऑल इंडिया रेंजर्स असोसिएशनने केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला. कार्यालयात आणि फिल्डवर असलेल्या अधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम केले. काही अधिकाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करून दिवसभर काम केले. नागपूर जिल्ह्यात जवळपास सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. कसलीही घोषणाबाजी न करता व काम प्रभावित होऊ न देता अधिकाऱ्यांकडून कामाच्या ठिकाणी मूक निषेध नोंदविण्यात आला.
...
एफडीसीएम कार्यालयातील रेंजर्सकडून निवेदन
एफडीसीएम कार्यालयातील रेंजर्सनी व्यवस्थापकीय संचालकांच्या माध्यमातून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) साईप्रसाद यांना निवेदन दिले. त्यात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासोबतच वनविभागातील महिला वर्गाला पुरेसे संरक्षण दिले जावे, अधिकारी वर्गाकडून होणाऱ्या त्रासाची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दीपाली यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून शिक्षा दिली जावी आणि भविष्यात असे प्रकार टाळले जावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
...