सगळेच मराठा आता ओबीसी होत आहेत छगन भूजबळ यांचा गंभीर आरोप
By कमलेश वानखेडे | Published: December 6, 2023 05:02 PM2023-12-06T17:02:37+5:302023-12-06T17:04:05+5:30
ओबीसी आयोग आता मराठा आयोग झालाय, छगन भुजबळ यांचा आरोप.
कमलेश वानखेडे, नागपूर : सगळेच मराठा समाजाचे लोक आता कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत व ओबीसी होत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणारच नाही. आयोगाचे सदस्यही राजीनामे देत आहेत. आता ओबीसी आयोग राहिलेला नाही, मराठा आयोग झाला आहे. हरीभाऊ राठोड हे ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप ओबीसी नेते अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी केला.
हिवाळी अधिवेशनासाठी बुधवारी भूजबळ यांचे नागपुरात आगमन झाले. नागपुरात दाखल होताच त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले, सगळेच मराठा आता ओबीसीमध्ये येऊ घातले आहे. त्यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे. न्यायमूर्ती शिंदे गावागावात जावून सांगताहेत हे द्या, ते द्या. अ,ब,क,ड़ वर्गवारीचा मी चांगला अभ्यास केला आहे.
सर्व समाजाला वेगवेगळे आरक्षण दिले आहे. याचा अभ्यास आरोप करणाऱ्यांनी करावा. ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कुणी प्रयत्न करू नये.जरांगे पाटील हेवीवेट वगैरे काही नाही. त्यांना कुणीतरी उंचीवर घेऊन जात आहे. त्यांच्याप्रमाणे सर्व गोष्टी घडताहेत, अशी टीकाही त्यांनी केली.