गुप्तधन व चिरतारुण्यासाठी केले खून; नागपूर पवनकर कुटुंबिय हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:24 AM2018-06-16T10:24:55+5:302018-06-16T10:25:09+5:30
गुप्तधन, अमरत्व आणि चिरतारुण्य मिळविण्याच्या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाप्रमाणे जपणाऱ्या सख्ख्या बहिणीसह तिचे अवघे कुटुंब आणि पोटच्या मुलाला क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याने संपविल्याचा संशय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुप्तधन, अमरत्व आणि चिरतारुण्य मिळविण्याच्या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाप्रमाणे जपणाऱ्या सख्ख्या बहिणीसह तिचे अवघे कुटुंब आणि पोटच्या मुलाला क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याने संपविल्याचा संशय आहे. त्याने या हत्याकांडानंतर मृत अर्चनासह अन्य व्यक्तींच्या डोक्यांचे केस कापले. या केसाची त्याने त्याच्या भाड्याच्या खोलीत अघोरी पूजा केली. त्यानंतर मृतांच्या नावाखाली ‘ते मेले’ असे लिहून नंतर ते पाण्याने पुसून काढले. सर्वत्र थरकाप उडवून देणाºया नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडात क्रूरकर्मा विवेक पालटकर संबंधी नवनवी धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. लोकमतने या संबंधाने नवनवीन खुलासे केले आहे. हत्याकांडानंतर क्रूरकर्म्याने मृतांची नावे कॅलेंडर (पोस्टर) वर लिहिल्याचे आणि जमिनीचे २४ हजार रुपये घेऊन पळाल्याचेही वृत्त लोकमतनेच प्रकाशित केले आहे, हे विशेष !
या क्रूरकर्म्याने रविवारच्या मध्यरात्रीनंतर बहीण अर्चना, तिची मुलगी वेदांती, पती कमलाकर आणिं सासू मीराबाई पवनकरसह स्वत:चा चार वर्षीय चिमुकला कृष्णा पालटकर याचीही निर्घृण हत्या केली होती. सोमवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. तेव्हापासून आरोपी पालटकर फरार आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेत आहेत. मात्र, हत्याकांडाला पाच दिवस होऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा माग काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी क्रूरकर्मा पालटकरची खरबीतील भाड्याची खोली शोधली. वृद्ध सुशिलाबाई गिरीपूंजे यांच्याकडून त्याने महिनाभरापूर्वी ही खोली भाड्याने घेतली होती. गुरुवारी त्या खोलीतील दृश्य पाहून खुद्द पोलीसही चक्रावले. नराधम पालटकरने मृतांची नावे कॅलेंडर (पोस्टर) वर लिहून ‘ते मेले’ असे लिहिले. एवढेच नव्हे तर या नराधमाने हत्याकांडानंतर रक्ताने माखलेले कपडे तेथे ठेवून विहिरीवर पहाटेच आंघोळ केली अन् अघोरी पूजाही मांडली. या पूजेत त्याने दही, दूध, निंबू, बाहुली, हळद, कुुंकू, अक्षत अन् बहीण अर्चनाच्या केसाचा आणि कोंबडीच्या पिसांचा वापर केला.
पोलिसांनी हे सगळे साहित्य तसेच आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. आळशी आणि अय्याश वृत्तीच्या नराधम पालटकरने गुप्तधन आणि चिरतारुण्य मिळविण्याच्या लालसेनेच ही अघोरी पूजा मांडल्याचा संशय आहे. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी तो जडीबुटीचा वापर करायचा. त्यामुळे तो जडीबुटीवाल्यांच्या नेहमी संपर्कात होता. लोकमतने हे आधीच प्रकाशित केले. दरम्यान, नराधम पालटकर याला जडीबुटी देणारांची नावे पोलिसांना माहीत झाली मात्र त्याला अघोरी पूजेचा सल्ला कोणत्या मांत्रिकाने दिला, ते अद्याप उघड झाले नसून पोलीस आता त्याचाही शोध घेत आहेत.
मंदिरातच झाली घरमालकिणीशी ओळख
अत्यंत अंधश्रद्ध असलेला नराधम पालटकर नेहमीच ठिकठिकाणच्या मंदिरात जायचा. खरबीतील रूम त्याला भाड्याने देणाऱ्या वृद्ध गिरीपुंजे आजींना तो मंदिरातच तीन-चार वेळा दिसला. तो फारसा बोलत नव्हता. त्यामुळे वृद्ध सुशीलाबार्इंनी त्याला भलामाणूस समजून रूम दिली. मात्र, रूम घेतल्याच्या काही दिवसातच त्याच्यातील विकृतपणा सुशीलाबाईनी हेरला. त्यामुळे त्याला त्यांनी रूम रिकामी करून मागितली होती.
दोन दिवस उमरेडमध्ये मुक्काम ?
हे थरारक हत्याकांड घडविणाऱ्या नराधम पालटकरचा पोलीस नागपूरसह त्याच्या मूळगावी, भंडारा, अमरावती अन् आजूबाजूच्या प्रांतातही शोध घेत आहेत. दुसरीकडे हा क्रूरकर्मा हत्याकांडानंतर दोन दिवस उमरेडमधील एका मंदिरात दडून होता, अशी माहिती अनेकांनी पोलिसांना कळविली आहे. सोमवारी दिवसभर आणि रात्रभर तो तेथे लपून बसला. मंगळवारी वृत्तपत्रात हत्याकांडाचे वृत्त आल्यानंतर आणि त्याचे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर तो तेथून सटकला. तत्पूर्वी, त्याला तेथे बाहेरगावचा मुसाफिर म्हणून अनेकांनी पाहूनही दुर्लक्षित केले. गुरुवारी सकाळी अनेकांनी नंदनवन पोलिसांना त्याची माहिती कळविली. त्यानंतर पोलीस पथक तिकडे जाऊन आले. मात्र, क्रूरकर्मा पालटकर पोलिसांच्या हाती लागला नाही.