नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांना जोडणार : ३८ कोटी रुपयांचा खर्च येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:17 PM2019-01-14T22:17:20+5:302019-01-14T22:35:43+5:30
काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
जिल्ह्यातील पारशिवनी, मौदा रामटेक आणि कामठी हे तालुके भौगोलिकदृष्ट्या सखल भागात येतात. या परिसरात अनेक नदी नाले आहे. हे नाले एकमेकांशी जोडले तर मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणे शक्य होईल. त्यासाठी जिल्ह्यात ‘वॉटर गेट’ नाले जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेवर ३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, टाटा ट्रस्ट आणि खनिज निधीच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
ही योजना पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नाग नदी व पिवळी नदी पूरमुक्त होणार
‘नाले जोड’ योजनेमुळे ग्रामीण भागाला फायदा होईलच. परंतु नागपूर शहरालाही मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाग नदी व पिवळ्या नदीला पूर येतो. नाले जोड योजनेमुळे या नद्यांना पूर येणार नाही. या दोन्ही नद्या पूरमुक्त होतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.